आषाढीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:43 PM2018-07-15T23:43:10+5:302018-07-15T23:43:15+5:30
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर झाला आहे. सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली होती. मात्र, आषाढ महिन्यामुळे दुकानामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त होती, तर भाज्यांची आवक
जास्त आल्याने दरांत घसरण झाली आहे.
बाजारात भाजीपाल्यासह फळांच्या दरामध्ये उतरण झाली आहे. डाळिंब प्रतिकिलो ३० रुपये होते. त्यांची आवक मोठ्या प्रमाणात आली आहे. ओली मिरची, ढबू मिरची, कारली, भेंडी, वरणा, दोडका, वाल, बिनीस, फ्लॉवर, पडवळ, दुधी भोपळा, शेवग्याची शेंग, कांदापात, मेथी, पोकळा, शेपू व पिकॅडोर यांमध्ये उतरण झाली आहे; पण वांग्याच्या दरामध्ये किंचित वाढ झाली आहे. वांगी २५ रुपये प्रतिकिलो होती. टोमॅटो दहा रुपये प्रतिकिलो, गवार ३० रुपये, आले ५० रुपये तर कोथिंबिरीची पेंढी पाच रुपये होती. याचबरोबर घेवडा निम्म्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात तो ५० रुपये होता, तो आता २५ रुपये झाला आहे. गाजरांचा दर स्थिर प्रतिकिलो २५ रुपये होता.
दुसरीकडे, उपवासाची एक नंबरची वरी ८० रुपये प्रतिकिलो, सावाभगर ७२ रुपयांना तर शाबू ६० रुपये, ५६ रुपये; शेंगदाणे ६० ते ७० रुपयांच्या घरात होते. खजूर ११० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत, राजगिरा ८० रुपये असा दर होता. याला ग्राहकांकडून मागणी होती. याचबरोबर शेंगतेल १२५ रुपये, सरकी तेल ९० रुपये, तर तूरडाळ ७० रुपये, हरभरा डाळ ६० रुपये अशी होती. ड्रायफ्रुट व तांदळाचे दर जैसे थे होते. फळांमध्ये संत्री, मोसंबी, चिकू यांच्या दरांत घसरण; तर पेरू, पपईचे दर जैसे थे आहेत; पण सीताफळाच्या दरांत वाढ झाली आहे. ढिगाचा दर ४०० रुपये होता.
मका कणसांचा दर झाला दीडपट
पावसाळ्यात जिभेला चव देणाऱ्या मक्याच्या कणसांच्या दरात वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात शेकड्याचा
दर ४२५ रुपये होता, तो ७०० रुपयांच्या घरात गेला आहे.
त्यामुळे कणसांच्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मात्र, ओल्या भुईमुगाच्या शेंगेच्या दहा किलोंच्या पोत्याचा दर ३८० रुपये झाला आहे. तो गेल्या आठवड्यात ४५० इतका होता.