शेतजमिनीवर वारस नोंद करण्यासाठी लाचेची मागणी, मंडलअधिकाऱ्यासह पंटरवर गुन्हा दाखल; पंटर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 02:10 PM2022-05-21T14:10:48+5:302022-05-21T15:08:15+5:30
पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी यांच्यासह पंटर'वर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कोल्हापूर : शेतजमिनीवर वारस नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी यांच्यासह पंटर'वर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मंडल अधिकारी संतोष सांगडे व पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा. विशाळगड) अशी या दोघांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी याबाबत माहिती दिली.
याबाबत माहिती अशी की, आंबा परिसरातील शेतजमिनीला वारस नोंदीसाठी तक्रारदाराने मंडलअधिकारी संतोष सांगडे यांच्याकडे अर्ज केला होता. मुबारक मुजावर (पंटर) यांच्याकरवी त्यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. गोपनिय चौकशीत लाचेची मागणी केल्याचे पुढे आले. याबाबतची पडताळणी १८ ते १९ एप्रिल २०२२ दरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.२०) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील मुबारक मुजावर यास लाचलुचपत विभागाने अटक करून शाहूवाडी पोलिस ठाण्याकडे पुढील तपासासाठी हजर केले. मुख्य संशयित सांगडे यास लवकरच ताब्यात घेतले जाईल. असेही उपअधीक्षक बुधवंत यांनी स्पष्ट केले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक (पुणे) राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलिस नाईक विकास माने, सुनील घोसाळकर, रुपेश माने, सुरज अपराध, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.