पश्चिम महाराष्ट्रात नव्या १९७ महाविद्यालयांची मागणी, कौशल्याधारित महाविद्यालयांना पसंती
By संदीप आडनाईक | Published: April 8, 2023 11:48 AM2023-04-08T11:48:36+5:302023-04-08T11:48:59+5:30
पाच वर्षांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून हा आराखडा तयार केला जात आहे
संदीप आडनाईक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून तब्बल १९७ नव्या महाविद्यालयांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक ९२, सांगलीतून ५३ आणि सातारा जिल्ह्यातून ५२ महाविद्यालयांची मागणी आहे. यात व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २०२४-२५ ते २०२८-२९ या शैक्षणिक वर्षासाठी पंचवार्षिक बृहत आराखड्याचे काम युद्धपातळवीर सुरू आहे, गुगल मिटद्वारे विविध बिंदूंवर आधारित ६ एप्रिलपर्यंत ५०२४ सूचना विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये अगदी डेन्मार्क, केनिया, बिहारमधील गया, राजस्थान, गुजरात येथूनही अभिप्राय आले आहेत, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.
पाच वर्षांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून हा आराखडा तयार केला जात आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्था प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांसह अन्य घटक गुगल मिटवरील प्रश्नावलीद्वारे अभिप्राय नोंदवीत आहेत. संकेतस्थळावरून सरकारकडे अभिप्राय नोंदविण्याची नवी सोय आता आली आहे.
असे आहेत प्रस्ताव
फार्मसी इन आयुर्वेदा, टूरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, आर्किटेक्चर, किचन गार्डनिंग, टेरेस गार्डनिंग, शेतीपूरक अभ्यासक्रम, समुपदेशन, इव्हेंट मॅनेजमेंट, क्रिमिनॉलॉजी, रुरल डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, स्लम इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम, आपत्ती व्यवस्थापन, न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, लोककला, फॉरेन्सिक सायन्स, ग्राहक संरक्षण, उर्दू कॉलेज, वास्तुशास्त्र, रुग्ण परिरक्षण.
- प्राचार्य/संचालक : १०५, शिक्षक : ७८३, पालक : ३२१, बिगर शासकीय संस्था : ८४, कॉलेज मॅनेजमेंट : ३५,
- उद्योजक : ९, शिक्षणतज्ज्ञ : ७, अधिकार मंडळ सदस्य : २९, नोकरदार, एचआर व्यवस्थापक : ७, विद्यार्थी : ३१२५, माजी विद्यार्थी : ४२९, प्रशासकयीय अधिकारी/कर्मचारी : ९०
कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालये
- कला, वाणिज्य आणि विज्ञान : ७४, शिक्षणशास्त्र : २०, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी : १६, फार्मसी : ७, आर्किटेक्चर : ४, विधी : २ (एकूण : १२३)
नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशींचा विचार करून बृहत आराखड्यात ‘जीआय’ या डिजिटल पद्धतीने नवीन बिंदू नोंदविण्यात येत आहेत. याचा आराखड्यात समावेश होईल. अभिप्रायांसाठी आता १५ एप्रिलपर्यंत मुदत आहे. यावर जास्तीत जास्त सूचना पाठवाव्यात. - डॉ. विलास सोयम, उपकुलसचिव, संलग्नता विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.