..मग ऑफलाईन परीक्षेचा अट्टहास का?, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 07:31 PM2022-01-31T19:31:12+5:302022-01-31T19:31:48+5:30
६५ टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण झाला असताना ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टहास का?,
कोल्हापूर : जर दहावी-बारावीचा ६५ टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण झाला असताना ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टहास का?, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी सोमवारी केली. त्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सत्यवान सोनवणे यांना दिले.
या समितीच्या शिष्टमंडळासह सुमारे दोनशे विद्यार्थी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिक्षण मंडळाच्या परिसरात पोहोचले. त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी समितीच्या मागणीनुसार सचिव सोनवणे त्याठिकाणी आले. दि. ४ ऑक्टोबरपासून दहावी-बारावीच्या वर्गासाठी ऑफलाईन शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
अशा परिस्थितीत केवळ दहा टक्के ऑफलाईन अभ्यासक्रमाच्या आधारे शिक्षण मंडळ ऑफलाईन परीक्षा घेणार आहे का? अभ्यासक्रम ऑनलाईन झाल्याने परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर हे निवेदन शासनाला पाठविण्यात येईल, अशी ग्वाही सोनवणे यांनी दिली.
यावेळी अथर्व चौगले, प्रतीकसिंह काटकर, विराज पाटील, गौरी पोवार, संस्कृती पाटील, कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, लहूजी शिंदे, महेश जाधव आदी उपस्थित होते.