हद्दवाढप्रश्नी पालकमंत्री हटावची मागणी, कोल्हापुरात कृती समितीची जोरदार निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:15 PM2023-03-21T12:15:19+5:302023-03-21T12:16:13+5:30
उद्योगमंत्री सामंत यांचे उत्तर चुकीचे, दिशाभूल करणारे व ते सुद्धा विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान ही बाब गंभीर स्वरूपाची
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात महिन्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात कोल्हापूर शहर हद्दवाढ व समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दुपारी निदर्शने केली. कोल्हापूरकरांचा अपमान करणाऱ्या केसरकर यांच्याकडील पालकमंत्रिपदाचा कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शहराच्या हद्दवाढीसंदर्भात कोणताही निर्णय होत नसल्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचे कृती समितीने ठरविले होते. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हद्दवाढ समर्थक व विरोधक अशा दोन्ही बाजूंची बैठक घेतली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर केसरकर यांनी महिन्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. परंतु, महिना होऊन गेला तरी बैठक आयोजित केली नाही, म्हणून कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी हे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या माध्यमातून पाठवावे अशी विनंतीही केली. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी विधिमंडळात मंत्री उदय सामंत यांनी हद्दवाढीची भूमिका स्पष्ट केली आहे, याकडे लक्ष वेधले तेव्हा कृती समितीचे सदस्य काहीसे संतप्त झाले.
उद्योगमंत्री सामंत यांचे उत्तर दिशाभूल करणारे
उद्योगमंत्री सामंत यांचे उत्तर चुकीचे, दिशाभूल करणारे व ते सुद्धा विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या नाहीत. निवडणूक केव्हा होणार याचे उत्तर आजही कोणी देऊ शकत नाही. वास्तविक स्वतःला अभ्यासू म्हणणारे व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणणाऱ्या पालकमंत्री केसरकर यांनी उद्योगमंत्री सामंत यांचे विधान बरोबर नाही, असे म्हणायला पाहिजे होते, पण त्यांनी तसे म्हटले नाही, असे बाबा इंदूलकर यांनी सांगितले. माजी महापौर आर. के. पोवार, दिलीप देसाई, अशोक भंडारे, बाबा पार्टे, अनिल कदम, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, चंद्रकांत पाटील यांनी निदर्शनात भाग घेतला.