कुरुंदवाडमधील बेघरांना जागा द्या नगराध्यक्षांकडे मागणी : लालबावटा युनियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:51 PM2018-06-28T23:51:06+5:302018-06-28T23:51:36+5:30
कुरुंदवाड : शहरातील बेघर कुटुंबांना राहण्यासाठी जागा मिळावी व त्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा; अन्यथा राज्य शेतमजूर लालबावटा युनियनच्यावतीने लाभार्थ्यांच्या कुटुंबासह पालिकेवर मोर्चा काढून बेमुदत कामकाज बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगराध्यक्ष जयराम पाटील यांना देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बेघरांना जागा मिळावी, यासाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी आंदोलने केली होती. या आंदोलनाची दखल घेत पालिकेने सभागृहाचा ठराव करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे; मात्र त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींनी केला नसल्याने प्रस्ताव रखडला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करून बेघरांना जागा मिळवून द्यावे, अन्यथा लाभार्थ्यांच्या मुलांबाळांसह पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसो कसबे यांनी केले. शिष्टमंडळात अरुण मांजरे, आक्काताई मोहिते, सविता कोथळे, सुषमा साबळे, महादेवी भंडारी, तबसुम शेख, जैथून बागवान, आदी सहभागी झाले होते.
क्रीडांगणाची शिवसेनेकडून मागणी
कुरुंदवाड : शहराला क्रीडा परंपरा आहे; मात्र, क्रीडांगणच नाही. त्यामुळे खेळाडूंच्या सोयीसाठी पालिकेने क्रीडांगण उभारावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना दिले. नगराध्यक्ष पाटील यांनी त्यासाठी जागेचा शोध घेऊन क्रीडांगण उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना शहराध्यक्ष राजू आवळे यांनी केले. निवेदनात कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे. येथील खेळाडू प्रत्येक खेळात पारंगत असून, आपल्या कामगिरीची चमक सातासमुद्रापार केली आहे. खेळाडूंना खेळाच्या सरावासाठी पालिकेचे तबक उद्यान आहे. मात्र, या मैदानाला सहा महिने तळ्याचे स्वरूप आलेले असते. त्यामुळे विविध खेळांतील खेळाडूंना खेळाचा सराव करता येत नाही.
पालिकेची विविध ठिकाणी आरक्षित जागा आहे. या जागांचा शोध घेऊन अद्ययावत क्रीडांगण करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते.
पाठपुरावा नाही
पालिकेने ठराव करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे; मात्र त्याचा पाठपुरावा झाला नसल्याने प्रस्ताव रखडला आहे.