धामणी प्रकल्पग्रस्त वसाहतीच्या नळ पाणी योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:38+5:302021-05-27T04:26:38+5:30
राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे, सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांच्या विशेष प्रयत्नातून या ...
राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे, सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांच्या विशेष प्रयत्नातून या प्रकल्पाच्या कामाला गती मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र धामणी मध्यम प्रकल्पा अंतर्गत विस्थापित पुनर्वसित गावे शासन विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाच्या याच विकासात्मक दृष्टिकोनातून धामणी प्रकल्पा अंतर्गत मानबेटपैकी राई (कंदलगाव वसाहत) या पुनर्वसित वसाहतीला स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सुमारे १२ वर्षांपासून रखडलेल्या नळपाणी योजनेचे काम नव्याने कार्यान्वित करून सदरची ही योजना प्रत्यक्षात राबविली जात आहे.
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून व प्रशासकीय अधिकारी यांच्या विकासात्मक विचारातून आकाराला आलेली नळ पाणी योजना राई या पुनर्वसित गावच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने राबवलेली योजना आहे. मात्र सदर नळ पाणी योजनेचे काम ठेकेदार यांच्याकडून योग्य पद्धतीने होत नाही. सदरचे काम ठेकेदार यांनी नळ पाणीपुरवठा योजना शासनाने बनवलेल्या आराखड्यानुसार होत नसून ठेकेदार मनमानी करत चुकीच्या पध्दतीने बांधकाम करत आहे.
योजनेच्या संदर्भात संबंधित जबाबदार अधिकारी यांच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता. त्यांच्याकडून योजनेबाबत योग्य माहिती दिली जात नाही. त्यामुळे याचा नेमका 'अर्थ' काय असा सवाल उपस्थित होत आहे. जॅकवेलचे बांधकाम चुकीच्या पध्दतीने केले असून संबंधित विभागातील कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांचे चुकीच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरी सदर पुनर्वसित गावासाठी राबविलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराकडून चाललेल्या चुकीच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
फोटो- राई- कंदलगाव धरणग्रस्त वसाहतसाठी नदीवर बांधण्यात येत असलेले जॅकवेल.