गाववेशीबाहेरून रस्ता काढण्याची करड्याळ ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:30+5:302021-01-03T04:24:30+5:30
सेनापती कापशी : गावात वाहतुकीची कोंडी व अपघाताचा धोका असल्याने सेनापती कापशी ते हमिदवाडा हा रस्ता गाववेशीबाहेरून काढण्याची मागणी ...
सेनापती कापशी : गावात वाहतुकीची कोंडी व अपघाताचा धोका असल्याने सेनापती कापशी ते हमिदवाडा हा रस्ता गाववेशीबाहेरून काढण्याची मागणी मौजे करड्याळ (ता. कागल) येथील ग्रामस्थांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे केली आहे.
सरपंच विठ्ठल टेपुगडे, सदाहसन सेवा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग बिरंजे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ॲड. अरुण पाटील, माजी सरपंच संजय पाटील, हनुमान सेवा संस्थेचे अध्यक्ष गजानन पाटील व सर्व ग्रामस्थांनीच ही मागणी केली आहे. त्यांच्यामते हा रस्ता गावाच्या वेशीबाहेरून शेतवडीतून ओढ्याला लागून मुख्य रस्त्याला जोडला जावा. कापशी-हमिदवाडा रस्त्यावर हे गाव मध्यभागीच आहे. या गावातून चार कारखान्यांची ऊस वाहतूक होते. बाळूमामा दर्शनासाठी प्रत्येक रविवारी व अमावास्या-पौणिमेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. उसासह दूध वाहतूक व इतर दळणवळण गावाच्या मध्यभागातून होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. रस्त्याच्या कडेलाच पिण्याच्या पाण्याची बोअर आहे. तिथेही महिलांची वर्दळ असते. गावातील वीज खांबांची ट्रॅक्टरसाठी अडचण होते. त्यातून दुर्घटना होण्याचा धोका आहे. या सगळ्याची दखल घेऊन गावाबाहेरून रस्ता व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
(विश्वासपाटील)