कोल्हापूरच्या सॅनिटायझरला दुबई, इंग्लंड, सिंगापूरकडून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:16 AM2020-04-18T11:16:31+5:302020-04-18T11:18:04+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या हॅँड सॅनिटायझर आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणाºया इथिल अल्कोहोलची दुबई, इंग्लंड, सिंगापूर, आदी परदेशांतून मागणी ...

Demand for Kolhapur Sanitizer from Dubai, England, Singapore | कोल्हापूरच्या सॅनिटायझरला दुबई, इंग्लंड, सिंगापूरकडून मागणी

कोल्हापूरच्या सॅनिटायझरला दुबई, इंग्लंड, सिंगापूरकडून मागणी

Next
ठळक मुद्देनिर्यात दुपटीने वाढली; विमानसेवेबाबत मुंबईतील कंपनीकडून विचारणा

कोल्हापूर : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या हॅँड सॅनिटायझर आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणाºया इथिल अल्कोहोलची दुबई, इंग्लंड, सिंगापूर, आदी परदेशांतून मागणी वाढली आहे. विमानसेवा बंद असल्याने जहाजाच्या माध्यमातून या देशांना सॅनिटायझर आणि इथिल अल्कोहोलची निर्यात केली जात आहे. इंदूर, अहमदाबाद येथे सॅनिटायझर पुरविण्याबाबत विमानसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबईतील एका औषध कंपनीने कोल्हापूर विमानतळ व्यवस्थापनाकडे केली आहे.

शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एकूण तीन कंपन्यांमध्ये, तर विविध सहा साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीच्या माध्यमातून हॅँड सॅनिटायझरची निर्मिती करण्यात येत आहे. कोरोनामुळे जानेवारीपासून सॅनिटायझरच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीने मार्च आणि एप्रिलमध्ये छोट्या दहा कंटेनरच्या माध्यमातून एकूण दोन लाख लिटर सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे.

लॉकडाऊनमुळे मुंबईतील जेएनपीटी येथे या कंपनीच्या सॅनिटायझरच्या ३५ हजार बाटल्यांचा कंटेनर अडकून पडला आहे. बाटल्या उपलब्ध होत नसल्याने आता बल्क स्वरूपात सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतील एका औषध कंपनीने कोल्हापूरहून विमानसेवा पुरविण्याबाबत गेल्या आठवड्यात विचारणा केली आहे. मात्र, त्यासाठीचा वेळ आणि दिवसाची माहिती त्यांनी अद्याप कळविलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील आपत्कालीन सेवेसाठी कोल्हापूर विमानतळ तयार असल्याचे विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांनी शुक्रवारी सांगितले.

परदेशांसह राज्य, जिल्ह्यात पुरवठा
झांबिया, फिलिपाईन्स, आदी विविध देशांमध्ये आम्ही सॅनिटायझर आणि इथिल अल्कोहोलचा पुरवठा करतो. गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या मागणीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सध्या दुबई, सुदान, मोरोक्को येथे सॅनिटायझरची निर्यात केली आहे. इंग्लंड, सिंगापूर, सौदी अरेबियातून मागणी आली आहे. देशातील कोलकाता, मध्यप्रदेश, हैदराबाद, गुजराथ, मुंबई, आदींसह कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही बल्क स्वरूपात पुरवठा करीत असल्याचे कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सर्वोत्तम ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दीपक पाटील यांनी सांगितले.

तीन कंपन्यांनी घेतले परवाने
वैद्यकीय उपकरणे आणि साधने, औषधनिर्मितीशी संबंधित असणाºया १२ कंपन्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. त्यांपैकी हॅँड सॅनिटायझर निर्मितीची सुविधा असलेल्या तीन कंपन्यांनी कोल्हापूर विभागातील अन्न व औषध प्रशासनाकडून सॅनिटायझरच्या निर्मितीचे परवाने घेतले आहेत. त्यांतील एक कंपनी कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीतून पूर्वीपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. सहा साखर कारखान्यांनीही याबाबतचे परवाने घेतले आहे. कोल्हापूरमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध असल्याची माहिती औषध निरीक्षक रोहित राठोड यांनी दिली.
 

 

Web Title: Demand for Kolhapur Sanitizer from Dubai, England, Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.