महाशिवरात्रीनिमित्त शाबू, वरी, राजगिऱ्यासह लिंबूला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:20 AM2019-02-25T10:20:58+5:302019-02-25T10:24:41+5:30
कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाशिवरात्री सण तोंडावर आल्याने शाबू, वरी, राजगिरा व शेंगदाण्यालाही मागणी वाढली.
कोल्हापूर : कडाक्याची थंडी कमी होऊन उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे; त्यामुळे आता थंडगार काकडी, लिंबंूना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रविवारच्या आठवडी बाजारात काकडीची आवक वाढली आहे. ती २० रुपये पावशेर होती; त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे, तर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, महाशिवरात्री सण तोंडावर आल्याने शाबू, वरी, राजगिरा व शेंगदाण्यालाही मागणी वाढली.
कोल्हापूर शहरात विशेषत: लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, गंगावेशीतील पाडळकर मार्केट, आदी बाजारांत शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातून ग्राहक खरेदीसाठी येतात. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात भाज्यांच्या दरात वाढ झाली असली, तरीही भाज्यांची मागणी वाढली आहे.
किरकोळ बाजारात कोबीचा गड्डा १0 रुपये, तर घाऊक बाजारात तो साडेसात रुपये असा होता. वांगी १0 रुपये, वरणा, दोडका ३० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलो, दोडका, काकडी ८० रुपये किलो असा दर होता. या दरात वाढ झाली आहे; पण घेवडा ४० रुपये, फ्लॉवर पाच ते सात रुपयांच्या घरात, तर मेथीची पेंढी पाच रुपये, पालक पेंढी तीन रुपये असा दर होता. यांच्या दरात घसरण झाली आहे.
याचबरोबर आता फेब्रुवारी संपत आल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे; त्यामुळे विशेषत: लिंबू, काकडीला मागणी वाढली आहे. रसरशीत लिंबूचा दर दोन ते अडीच रुपये असा होता. लिंबूची आवक वाढली आहे. ते घाऊक बाजारात ५५० रुपये चुमडे होते. तसेच द्राक्षे ३० रुपये किलो होती; मात्र सफरचंदाचे दर स्थिर होते. कलिंगड २० रुपये होते, तर हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. आंब्यांचा बॉक्स ५०० रुपये असा होता.
महाशिवरात्रीनिमित्त शाबू ५६ रुपयांवरून ६० रुपये किलो, वरी व राजगिरा ८० रुपये किलो, तर शेंगदाणे ९० रुपयांपासून ते १०० रुपयांच्या घरात होता. त्याला ग्राहकांची मागणी होती. हरभरा डाळ ७०, मूगडाळ व उडीद डाळ ८८ रुपये, तूरडाळ ८४ रुपये, तसेच शेंगतेल १२५ रुपये, सरकी तेल ९० रुपये व सुके खोबरे २०० रुपये प्रतिकिलो होते. रत्नागिरी तांदूळ ४४ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत, तर आंबेमोहर ७६ रुपये, बासमती ४० रुपयांपासून ६८ रुपये होता.
साखर वाढली...
साखरेच्या किमान दरात केंद्र सरकारने प्रतिक्विंटल वाढ केली आहे. यापूर्वी तो २९०० रुपये होता, तो आज ३१०० रुपये झाला; त्यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या प्रतिकिलो दरात आपोआपच वाढ झाली. ती ३४ रुपयांवरून ३६ रुपये झाली असल्याचे व्यापाºयांतून सांगण्यात आले.