सूतदराप्रश्नी बैठक लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:14+5:302020-12-08T04:22:14+5:30
इचलकरंजी : सूत व्यापाऱ्यांकडून सुताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यंत्रमाग उद्योग बंद ठेवता येत नसल्याने त्याचा गैरफायदा ...
इचलकरंजी : सूत व्यापाऱ्यांकडून सुताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यंत्रमाग उद्योग बंद ठेवता येत नसल्याने त्याचा गैरफायदा घेत सूत व्यापारी सूतदरात दरवाढ करीत आहेत. याबाबत स्थानिक सूत व्यापारी व यंत्रमागधारक संघटनांमध्ये बैठक घेऊन सुताचा काऊंट, वजन व बिले या मुद्द्यांवर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशा मागणीचे निवेदन क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने प्रांताधिकारी यांना दिले.
निवेदनात, मार्च २०२० पासून कोरोनामुळे गत सहा-सात महिन्यांपासून वस्त्रोद्योगाचे प्रचंड नुकसान झाले. अजूनही यंत्रमागधारक नुकसानीत उद्योगधंदा चालवत असतानाच सुताची दरवाढ हे नवीन संकट उद्योगासमोर उभे राहिले आहे. या सुताचा स्थानिक व्यापाऱ्यांकडून पुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून या सूत दरात भरमसाट वाढ होत असल्याचे म्हटले आहे. शिष्टमंडळात सतीश कोष्टी, पुंडलिक जाधव, सागर चाळके, प्रकाश मोरे, विनय महाजन, विश्वनाथ मेटे यांच्यासह यंत्रमागधारक व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.