उदगाव शासकीय कोविड सेंटरमध्ये पैशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:24 AM2021-05-17T04:24:45+5:302021-05-17T04:24:45+5:30
उदगाव : उदगाव, ता.शिरोळ येथील शासकीय कुंजवन कोविड सेंटरमध्ये मृतदेह रॅपिग व रुग्णवाहिकेसाठी सहा ...
उदगाव : उदगाव, ता.शिरोळ येथील शासकीय कुंजवन कोविड सेंटरमध्ये मृतदेह रॅपिग व रुग्णवाहिकेसाठी सहा हजार रुपये द्या, मगच मृतदेह न्या, अशी अजब मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केल्याने नातेवाइकांनी कुंजवन सेंटरसमोर ठिय्या मारला व तत्काळ सभापती स्वाती सासणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सासणे यांनी तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांना जाब विचरल्यानंतर मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चिंचवाड, ता. शिरोळ येथील रामचंद्र राहू ठोमके यांचे कोरोनाचे रविवारी रात्री नऊच्या सुमारास सेंटरमध्ये निधन झाले. ही बाब नातेवाइकांना कळल्यानंतर महादेव सातपुते, सचिन जाधव, तुकाराम ठोमके, चंद्रकांत पाटील हे कोरोना सेंटरमध्ये पोहोचले. तद्नंतर कर्मचाऱ्यांनी रॅपिग व रुग्णवाहिकेसाठी सहा हजार रुपये द्या तसेच पीपीए कीट संपले आहेत ते घेऊन या असे सांगितले. त्यानंतर घडला प्रकार चंद्रकांत पाटील यांनी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांना सांगून कोविड सेंटरच्या गेटवर ठिय्या मारला.
त्यांनतर घडलेल्या प्रकारचा जाब तहसीलदार डॉ. अपर्णा धुमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस. दातार व गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना विचारला व असा प्रकार शासकीय कोविड सेंटरमध्ये होत असला तर याचा आवाज उठवू व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तक्रार दाखल करू, असे सांगितले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
फोटो ओळ- कुंजवन कोविड सेंटर उदगावच्या दारात ठिय्या मारलेले नातेवाईक महादेव सातपुते, सचिन जाधव, तुकाराम ठोमके, चंद्रकांत पाटील, आदी.