काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीलाही ‘डिमांड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:18+5:302021-02-15T04:21:18+5:30
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही ‘डिमांड’ वाढला आहे. १०० पेक्षा जास्त इच्छुकांकडून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणीचे अर्ज ...
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही ‘डिमांड’ वाढला आहे. १०० पेक्षा जास्त इच्छुकांकडून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणीचे अर्ज आले आहेत. यामध्ये काही प्रभागांत तीन ते चार इच्छुक आहेत. यामुळे उमेदवारी देणे नेत्यांना डोकेदुखीचे ठरणार आहे. शिवसेनेमधूनही उमेदवारीसाठी काही प्रभागांत जोरदार चढाओढ आहे. भाजप, ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून, छुपी रणनीती आखण्यामध्ये ते व्यस्त आहेत. ऐनवेळी ते ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी पत्ते खोलण्यास सुरू केली आहे. पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे, तसेच गेल्या दहा वर्षांत महापालिकेवर सत्ता असल्यामुळे बहुतांशी इच्छुकांची काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून उमेदवारीसाठी धडपड सुरू आहे.
राष्ट्रवादीने पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. शहराध्यक्ष आर.के. पोवार यांच्याकडे अर्ज दाखल होत आहेत. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडे १०० पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यामध्ये यादवनगर प्रभाग क्रमांक ३५ मधून सर्वाधिक अर्ज आले आहेत. काँग्रेसमधून उमेदवारी मिळणार नसल्याचे समजल्याने काहींनी राष्ट्रवादीकडे मोर्चा वळविला आहे.
भाजप, ताराराणी आघाडीकडूनही निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्यात सत्ता नसली तरी आघाडी आणि नेत्यांशी कट्टर असणाऱ्यांनी भाजप, ताराराणी आघाडीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये काही विद्यमान नगरसेवक आहेत.
शिवसेनेचा महापौर होण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी चंग बांधला आहे. त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ते राहत असलेल्या प्रभागावर त्यांचे विशेष लक्ष असून येथील प्रत्येक जागा निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
चौकट
राष्ट्रवादीचे टार्गेट ५० जागा
राष्ट्रवादीचे गत निवडणुकीमध्ये १४ प्रभागातीलच उमेदवार विजयी झाले. याची सल नेत्यांना आजही आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. तीन ते चार वेळ कोअर कमिटीची बैठक घेतली आहे. सर्व ८१ प्रभागांत उमेदवार देऊन ५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे टार्गेट आहे.