मागणी साडेतेरा कोटींची; मंजूर केवळ चारच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:14 AM2019-07-24T01:14:53+5:302019-07-24T01:16:13+5:30
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमाभागातील रुग्णांचा आधारवड म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे (सीपीआर)कडे पाहिले जाते; पण अपुऱ्या निधीअभावी या ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडले आहे.
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालय प्रशासनाकडे अपुरी यंत्रसामग्री असल्याने रुग्णसेवेवर मर्यादा पडत आहेत. शासनाकडून औषध व यंत्रसामग्रीसाठी अत्यल्प निधी मिळत असल्याने रुग्णावर उपचार करताना खर्चासाठी कसरत करावी लागत आहे. २०१८-१९ मध्ये सहा कोटी ३४ लाख रुपये निधी शासनाकडून मिळाला; तर चालू वर्षात १३ कोटी ५८ लाखांची मागणी असताना शासनाकडून अवघे चार कोटी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यांपैकी दीड कोटी रुपये नुकतेच मिळाले आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमाभागातील रुग्णांचा आधारवड म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे (सीपीआर)कडे पाहिले जाते; पण अपुऱ्या निधीअभावी या ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडले आहे. प्रत्येक वेळी निधी नसल्याने यंत्रसामग्री नाही, निधी नसल्याने औषधे नाहीत, निधी नसल्याने यंत्रसामग्री दुरुस्तीअभावी बंद अशी वारंवार कारणे प्रशासनाकडून पुढे येऊ लागल्याने नागरिकांतून संतापाची लाट उमटत आहे. सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार नव्हे, पण चांगली सुविधा मिळावी अशी ‘सीपीआर’कडून अपेक्षा असताना निधीच्या नावाखाली येथील रुग्णसेवेचे तीनतेरा वाजू लागले आहेत. राज्यातील सरकारी रुग्णालयांना हाफकिन इन्स्टिट्यूट या कंपनीकडून औषधे पुरविली जातात.
‘सीपीआर’मध्ये २०१८-१९ मध्ये दोन कोटी ६० लाख ५७ हजारांची, तर २०१९-२० मध्ये एक कोटी २४ लाख ६४ हजार रुपयांची औषधे हाफकिन कंपनीकडून पुरविली गेली आहेत. २०१९-२० साठी फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुमारे एक कोटी ४५ लाखांची मागणी असताना त्यापैकी फक्त ८० लाख रुपये निधी मिळाला आहे. अपुºया निधीमुळे प्रशासनाला रुग्णसुविधा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडण्याच्या मार्गावर आहे.
साडेसहा कोटींच्या यंत्रसामग्रीची प्रतीक्षाच!
सध्या सीपीआर, शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालय प्रशासनाकडे अपुरी यंत्रसामग्री असल्याने रुग्णसेवेवर मर्यादा पडत आहेत. या यंत्रसामग्रीसाठी सुमारे सहा कोटी ३० लाख रुपयांची विविध विभागांची यंत्रसामग्री मंजूर झाली आहे. त्याप्रमाणे यंत्रसामग्रीची मागणीही केली आहे; पण त्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करण्याची प्रशासनावर वेळ आली आहे. विशेष म्हणजे, व्हेंटिलेटर आणि भुलीची यंत्रसामग्री गेली सहा महिने प्रतीक्षेतच आहे.
‘हार्ट’ विभाग बेस्टच...
सीपीआर रुग्णालयातील हार्ट विभागातील यंत्रसामग्री कालबाह्ण झाली असली तरीही याच यंत्रसामग्रीवर अॅँजिओग्राफी, अॅँजिओप्लास्टीसह इतर लहानमोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. २०१८-१९ मध्ये पश्चिम महाराष्टÑात सर्वांत जास्त म्हणजेच १२५० शस्त्रक्रिया ‘सीपीआर’च्या हार्ट विभागात झाल्या आहेत.
वर्षभरात देणगी स्वरूपात मिळालेला निधी व यंत्रसामग्री
डायलेसिस युनिट - रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर
काडिएक्स -इंडोकाउंट कंपनी
आमदार अमल महाडिक - ४३ लाख रुपयांची वैद्यकीय साधने
आमदार राजेश क्षीरसागर- १ कोटी रुपये आमदार निधी मंजूर
हॉस्पिटलसाठी मिळालेला निधी
१ कोटी २३ लाख ७३ हजार
कॉलेजसाठी निधी : २८ लाख (जून २०१८)
नियोजन मंडळ : ३ कोटी ३५ लाख ८६ हजार
५२ लाख ५४ हजार (फेब्रुवारी २०१९ यंत्रसामग्री खरेदीसाठी)
नेहमी लागणारी औषध दरमहा मिळतात मागणी
श्वान रेबीज १००० ९०००
सर्पदंश १५०० (साठा भरपूर शिल्लक)
सलाईन (आरएल) १० हजार ३० हजार