सेंद्रिय शेतीच्या ‘सोनकेळीं’ना मागणी
By Admin | Published: December 29, 2014 11:31 PM2014-12-29T23:31:01+5:302014-12-29T23:44:58+5:30
बहुपिकांचा प्रयोग : दोन एकरांत प्रतिवर्षी तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न
आजरा तालुक्यातील पोळगाव येथील जयसिंग शामराव नार्वेकर या शेतकऱ्याने ‘सोनकेळीं’चे सेंद्रिय पद्धतीने पीक घेत एकरी तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली असून, सेंद्रिय केळींचे महत्त्व ओळखणाऱ्या मंडळींकडून या केळींना मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
जयसिंग नार्वेकर यांनी नवा प्रयोग म्हणून सोनकेळींचे उत्पादन घेण्याचे ठरविले. त्यासाठी कोकणातून त्यांनी १२०० मोने खरेदी केले. ६ बाय ८ ची सरी तयार करून त्यामध्ये त्यांची लावण केली. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत अथवा कीटकनाशके न वापरता गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत यांचा वापर केला. गांडूळ खत निर्मितीसाठी स्वत:च्या शेतामध्ये एक युनिट उभे केले आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करीत पाण्याचा पुरवठा केला आहे.
सरींमध्ये कलिंगड, टोमॅटो यांचे आंतरपीक देखील घेतले, तसेच भाजीपालाही पिकविला आहे. बाहेरील कोणताही पगारी मजूर, कामगार न घेता पत्नी शांताबाई, वडील शामराव नार्वेकर व आई लक्ष्मी यांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून दिला. आंतरपीक म्हणून घेतलेल्या कलिंगड पिकातून त्यांना ८० हजार रुपये प्रतिवर्षी उत्पन्न अपेक्षित आहे. एकदा केळी लागवड केल्यानंतर साधारणपणे कमीत कमी तीन वर्षे नवीन फुटवे येऊन उत्पादन चालू राहते.
प्रत्येक घडाला ८ ते १२ डझन केळी व या प्रकारच्या केळींचा बाजारातील सध्याचा दर प्रतिडझन ३० ते ४० रुपये इतका गृहित
धरल्यास कमीत कमी तीन लाखांचे निव्वळ
उत्पन्न त्यांना प्रतिवर्षी मिळत आहे. सेंद्रिय
पद्धतीने तयार झालेल्या या केळांना स्थानिक बाजारपेठेसह गडहिंग्लज, बेळगाव, कोकण येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. फळ पिकल्यानंतर किमान १५ दिवस खराब होत नाही, हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
- ज्योतिप्रसाद सावंत ल्ल आजरा
अनेकांना केले मार्गदर्शन
नार्वेकर यांचा सोनकेळी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्याने अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस व अन्य पिकांऐवजी केळी पिकविण्यास सुरुवात केली आहे.