नाशिकच्या पुरणपोळी, पापलेटला ‘डिमांड’
By admin | Published: February 6, 2015 12:19 AM2015-02-06T00:19:56+5:302015-02-06T00:47:04+5:30
ताराराणी महोत्सव : रात्री उशिरापर्यंत गर्दी; महाविद्यालयीन मुलींची हजेरी
कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर विभागीय पातळीवरील ‘ताराराणी महोत्सव २०१५’ च्या दुसऱ्या दिवशी दिवसभर गर्दी होती. कॉलेजच्या मुलींची हजेरी लक्षवेधी ठरली. सर्वच खाद्य स्टॉलवरील चव खवय्यांनी चाखली. कोकणातील पापलेट मासा आणि नाशिकच्या पुरणपोळीला गुरुवारी मागणी अधिक होती. १० फेब्रुवारीपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे.पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, आदी जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेखालील महिला बचतगट उत्पादित वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. विविध प्रापंचिक वस्तू, काजू, बदाम यांचे दर खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत दर कमी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.विविध रंग, साईजच्या चप्पल खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी होत आहे. शाकाहारी आणि मांसाहारीतील सर्वच मेन्यू तयार करून दिले जातात. कोल्हापुरी पांढरा, तांबडा रस्साही येथे उपलब्ध आहे. या प्रदर्शनात सोलापुरी चादरींची उणीव जाणवत आहे. संयोजकांना काही ग्राहक सोलापुरी चादरी कुठे आहेत, अशी विचारणा करीत आहेत. दरम्यान, महिला सक्षमीकरण आरोग्य शिक्षण, पंचायत राज, मार्केटिंग, लेबलिंग या विषयावर जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांना स्वयंसिद्धा समूहाच्या प्रमुख कांचन परुळेकर, विजय भोसले यांनी प्रशिक्षण दिले. (प्रतिनिधी)
भाऊराया वाचव रे...
केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ ची जागृती अतिशय कल्पकपणे केली आहे. एका स्टॉलमध्ये आपल्या कर्तृत्वाने चमकदार कामगिरी केलेल्या व करीत असलेल्या महिलांची छायाचित्रे लावली आहेत. तेथेच ‘तू वंशाचा दिवा, आमचे जगणे बेचव रे, वेड्या बहिणीची मागणी, भाऊराया वाचव रे’ अशी मनाचा वेध घेणारी घोषवाक्य लिहिली आहेत.