इंग्रजी शाळांचा लाक्षणिक बंद, आरटीई अंतर्गत थकीत परताव्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 02:19 PM2019-02-26T14:19:59+5:302019-02-26T14:21:17+5:30
आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा देण्यासाठी राज्य शासनाने लादलेल्या जाचक अटींविरोधात सोमवारी इंडिपेंडंट इंग्लिश मीडिअम स्कूल्स असोसिएशनच्यावतीने शाळा बंद ठेवून निषेध करण्यात आला. याअंतर्गत राज्यातील साडेचार हजार व कोल्हापूर जिल्ह्यातील १६१ शाळा सहभागी झाल्या.
कोल्हापूर : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा देण्यासाठी राज्य शासनाने लादलेल्या जाचक अटींविरोधात सोमवारी इंडिपेंडंट इंग्लिश मीडिअम स्कूल्स असोसिएशनच्यावतीने शाळा बंद ठेवून निषेध करण्यात आला. याअंतर्गत राज्यातील साडेचार हजार व कोल्हापूर जिल्ह्यातील १६१ शाळा सहभागी झाल्या.
या आंदोलनाला कोल्हापुरातील इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. असोसिएशनच्यावतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे व माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने आरटीई २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा देण्यासाठी १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या आदेशाद्वारे जाचक अटी लादल्या आहेत.
गेल्या सहा वर्षांत प्रवेश देताना सर्व शाळा पात्र होत्या. मात्र, आता फी परतावा देताना त्यांची पात्रता तपासणी करणे म्हणजे शाळांवर अन्याय आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, थकीत फी परतावा तातडीने अदा करावा. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश पोळ, कार्याध्यक्ष गणेश नायकुडे, माणिक पाटील, अजित घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.