भोगावती नदीवरील जुन्या धरणवजा पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:04+5:302021-06-03T04:18:04+5:30
शिरगाव : शिरगाव ( ता. राधानगरी )येथील भोगावती नदीवरील जुन्या धरणवजा पुलाची दुरूस्ती करून पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करावी ...
शिरगाव : शिरगाव ( ता. राधानगरी )येथील भोगावती नदीवरील जुन्या धरणवजा पुलाची दुरूस्ती करून पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करावी अशी मागणी या परिसरातील जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.
शिरगाव - आमजाई व्हरवडे दरम्यान भोगावती नदीवर ६२ वर्षांपूर्वी धरणवजा पूल बांधण्यात आले आहे. या पुलावरून या परिसरातील शंभरवर वाड्या वस्त्यांमधील जनतेची ये-जा असते. कोल्हापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक साखर कारखान्याची ऊस वाहतूक या पुलावरून करण्यात आली आहे. दुर्गमानवाड येथील हिंडाल्को कंपनीचे बाॅक्साईड , तुळशी , धामणी ,केळोशी ,खामकरवडी येथील लघु व मध्यम पाणी प्रकल्पासाठी लागणारी सामग्री , अजस्त्र आकाराची मोठ मोठ्या मशिनरी या पुलावरून करण्यात आली होती.
या परिसरातील वाहतूकदारांना मुख्य असणाऱ्या या पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पिलर ढासळले आहेत. साईडचे गार्ड सुद्धा मोडून पडले आहे.नवीन पूल केव्हा होईल तेव्हा होईल पण आहे या पुलाची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
फोटो : शिरगाव ता. राधानगरी येथील पुलावरून वाहतूक करताना मोठमोठे खड्डे पडल्याने कसरत करावी लागत आहे.
छाया. बाजीराव फराकटे शिरगाव