शिरोळ तालुक्यातील ऊस रोपांना कर्नाटकात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:38+5:302021-04-21T04:23:38+5:30
रमेश सुतार बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्यातील हायटेक उसाची रोपे आता विजापूर, इंडी, सिंदगी, गुलबर्गा, जमखंडी, मुधोळ, बदामी, कोलार, बागलकोट, ...
रमेश सुतार
बुबनाळ : कोल्हापूर जिल्ह्यातील हायटेक उसाची रोपे आता विजापूर, इंडी, सिंदगी, गुलबर्गा, जमखंडी, मुधोळ, बदामी, कोलार, बागलकोट, अलमट्टी, कित्तूर या भागात उसाची मिरगी ऊस लागणीसाठी मागणी वाढत आहे. शिरोळ तालुक्यातील बुबनाळसह परिसरातील नर्सरीमध्ये उसाची रोपे घेण्यासाठी कर्नाटक राज्यातील शेतकरी येत आहेत.
उत्तर कर्नाटकातील शेतकरी ऊस या शाश्वत पिकाकडे वळला आहे. येथील शेतकरी वर्ग एप्रिलमध्ये रोप लागण करतात. कर्नाटकातील उसाचा गळीत हंगाम बंद होत असताना या उसाची तोड केली जाते. सरासरी ५० ते ५५ टन एकरी उत्पादन त्यांना मिळते.
बागलकोट, रामदुर्ग, विजापूर या जिल्ह्यातील जमिनीची प्रत चांगली असल्याने दोन वर्षात लागण, खोडवा अशी दोन पिके घेतली जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३०० रोपवाटिकेमधून कर्नाटकात ऊस रोपे जात आहेत. एका रोपाची २ रुपये १० पैसे दराने विक्री होत आहे. येथील ऊस रोपे दर्जेदार असून रोगांना बळी पडत नसल्याने याठिकाणच्या रोपांना मागणी वाढली आहे. ८६०३२, १००५, ८००५, २६५, ९००४, १८०२४ या जातीची रोपे लागणीसाठी वापरतात.
-------------------
कोट -
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस रोपे दर्जेदार असतात. कर्नाटकात ऊस बियाणांची उपलब्धता नसल्याने आम्ही या भागातील ऊस रोपांची मागणी करतो.
- श्रीकांत भोकरे, रामदुर्ग, जि. बागलकोट
कोट -
मार्च-एप्रिल या दोन महिन्यात उत्तर कर्नाटकात वीस लाख रुपयांची रोपे विकली गेली आहेत. ऊस रोपांना येथील हवामान अनुकूल असल्याने रोपे चांगली उगवतात. त्यामुळे दोन-तीन वर्षात मिरगी हंगामाकरिता रोपांना मागणी वाढली आहे. दोन ते अडीच हजार एकर रोपे लागण या दुष्काळी भागात झाली आहे.
- भरत मरजे, ऊस रोपवाटिका, बुबनाळ
फोटो - २००४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ -
बुबनाळ (ता. शिरोळ) येथील ऊस रोपांना कर्नाटकातून मागणी वाढली आहे.