मोबाईलवरील कोरोनाचे संदेश बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:17+5:302020-12-17T04:47:17+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या जनजागरणासाठी सुरू केलेली मोबाईलवरील संदेश मोहीम आता थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात ...
कोल्हापूर : कोरोनाच्या जनजागरणासाठी सुरू केलेली मोबाईलवरील संदेश मोहीम आता थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी येत असल्याने फोन लावताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे संदेश बंद करण्याची गरज व्यक्त होत आहे.
भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जनजागरण करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही संदेश मोेहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात कोरोनाबाबत फारशी माहिती नसल्याने या संदेशांचा चांगला फायदा झाला. त्यातील गांभीर्यही नागरिकांच्या लक्षात आले. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी आली आहे. नवे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे हे संदेश बंद करण्याची गरज व्यक्त होत आहे.
चौकट
आपत्कालीन परिस्थितीत संदेशांची अडचण
सध्या कोणताही मोबाईल लावल्यानंतर कोरोनाचा हा संदेश ऐकावा लागतो. तेव्हा पलीकडच्या माणसाला फोन लागला आहे की नाही हेदेखील फोन करणाऱ्याला समजत नाही. अपघात, डॉक्टरांची गरज असते तेव्हा, एखादी दुर्घटना घडताना अशा पद्धतीने वेळ जाणे धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच हे कोरोना संदेश बंद करण्याची मागणी होत आहे.
कोट
तातडीने फोन लावताना कोरोना संदेश अडचणीचा ठरत आहे. आता कोरोनाविषयक जनजागरण झाले आहे. सूचना पाठ झाल्या आहेत. नागरिक शक्य तेवढी काळजी घेत आहेत; परंतु अतितातडीच्या वेळी फोन लागण्यापेक्षा संदेश ऐकण्यात जास्त वेळ जात आहे. त्यामुळे संदेश बंद झाल्यास नागरिकांच्या सोयीचे होईल.
- दीपक गायकवाड