कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्याकडून लाचेची मागणी, निपाणीतील आयकर अधिकारी पाच लाखांची लाच घेताना जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:11 PM2023-10-14T13:11:32+5:302023-10-14T13:12:14+5:30
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंकली (ता.चिक्कोडी) येथील सोन्याचे दागिने विक्रीच्या व्यापाऱ्याला कारवाईची भीती दाखवून पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या ...
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंकली (ता.चिक्कोडी) येथील सोन्याचे दागिने विक्रीच्या व्यापाऱ्याला कारवाईची भीती दाखवून पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला शुक्रवारी जेलची हवा खायला पाठवण्यात हुपरी (ता. हातकणंगले) येथील कर सल्लागार (सीए) कृष्णा बोरचाटे (मूळ गाव पोहाळे, ता.पन्हाळा) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अविनाश टोणपे (रा.बेळगांव) असे अटक केलेल्या त्या प्राप्तिकर अधिकाऱ्याचे नाव आहे. बेळगाव येथील केएलईएस डेंटल कॉलेजच्या आवारात ही कारवाई झाली. टोणपे हा आयकर विभागाच्या निपाणी कार्यालयात काम करतो.
बेळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकलीतील माणकापूर ज्वेलर्सचे मालक परशुराम विठ्ठलसा बंकापूर यांचा विविध दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी अविनाश चार दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात गेला. तुमच्याकडून दहा हजार रुपयांचा कर कमी भरला असल्याचे सांगून तुमच्या व्यवहारांची खोलात जाऊन चौकशी केल्यास जेलची हवा खायला लागेल, अशी भीती घातली. त्यामुळे बंकापूर यांनी याबाबत बोरचाटे यांना माहिती दिली व पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला.
बंकापूर यांच्याकडे पाच लाखांची लाच मागितल्याचा टोणपे याच्यावर आरोप आहे. त्यानंतर, बंकापूरने सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) नारायण बर्मणी यांच्याशी संपर्क साधला आणि प्राप्तिकर अधिकाऱ्याच्या कथित छळाची माहिती दिली. बर्मणी यांनी एक पथक तयार करून खासगी गणवेशात सापळा रचला. बंकापूर यांच्याकडून पाच लाख रुपये स्वीकारताना टोणपे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.