नरेंद्र मोदींच्या नावावर गॅस ग्राहकांना दादागिरी
By admin | Published: June 10, 2017 12:42 AM2017-06-10T00:42:53+5:302017-06-10T00:42:53+5:30
ग्राहकांमधून संतप्त सूर : गॅस वितरकांच्या प्रतिनिधींचे कनेक्शन तपासणीवेळी उद्धट वर्तन
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र आले आहे...आपल्या गॅसची तपासणी करायची आहे...तपासणी नाही करून दिली तर गॅस कार्डवर फुली मारायची...’असे उद्योग गॅस वितरकांनी नेमलेल्या प्रतिनिधींकडून सुरू आहेत. त्यामुळे गॅस ग्राहकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. याबाबत ग्राहकांनी थेट गॅस वितरकांकडे लेखी तक्रार दाखल केल्या आहेत.
गॅस कनेक्शन तपासणीसाठी एकावेळी चार-चार प्रतिनिधी घरात जाऊन तपासणीची सक्ती करत आहेत. यावेळी नरेंद्र मोदींनी आम्हाला गॅस तपासणीसाठी पत्र दिले असून त्यानुसार आम्ही तपासणी करत असल्याचे सांगत ग्राहकांशी उद्धट वर्तन केले जात आहे. याबाबत शनिवार पेठेतील काही ग्राहकांना याचा त्रास झाला आहे. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी संबंधित गॅस एजन्सीकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. त्यावर आमच्याकडून फक्त तपासणी सुरू असून अशा पद्धतीने सक्ती करण्याबाबत कोणालाही सांगण्यात आलेले नाही, असे संबंधित गॅस वितरकांकडून स्पष्ट केले आहे.
असे असले तरी ज्यांना आपण गॅस कनेक्शन तपासणीसाठी नेमतो त्यांच्या चारित्र्याचा थोडा फार तरी विचार या गॅस वितरकांनी केला पाहिजे, असा सूर ग्राहकांमधून उमटत आहे. आपल्याला ज्या गॅस वितरकाने पाठविले आहे, त्यांचे नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन दादागिरीच्या भाषेत अशा पद्धतीने तपासणी करण्याचा उद्देश काय? तपासणीसाठी एखादा प्रतिनिधी येणे ठीक आहे, एकावेळी चार-चार प्रतिनिधी घरात जाऊन तपासणी का करत आहेत? तपासणीला विरोध केल्यास नरेंद्र मोदींनी सांगितले आहे म्हणून गॅस कार्डवर फुली मारली जात आहे,अशा चुकीच्या पद्धतीने सक्ती करून ग्राहकांना का त्रास दिला जात आहे, असा सवाल ग्राहकांमधून उपस्थित होत आहे. जर तपासणीच करायची असेल तर व्यवस्थितपणे ग्राहकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेणे अपेक्षित आहे.
सध्या सुरू असलेली तपासणी ही नियमित तपासणी आहे. यासाठी कोणत्याही प्रतिनिधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अन्य कुठलेही पत्र दिलेले नाही. त्यांना तपासणीसाठी कोणावरही सक्ती करू नका, असे सांगण्यात आले असून ज्यांना तपासणी करायची नाही, त्यांच्याकडून फक्त लेखी घ्या, असे सांगितले आहे. याउलट जर कोणी प्रतिनिधी ग्राहकांवर सक्ती करत असेल त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.
-संजय कर्वे, सेल्स आॅफिसर, एचपीसी
गॅस तपासणीसाठी सरकारने परवानगी दिली आहे; परंतु कनेक्शन तपासणीवेळी कोणावरही सक्ती करून अरेरावीची भाषा वापरा, असे कोणालाही सांगितलेले नाही. असे प्रकार घडत असल्यास ते गंभीर आहे. ग्राहकांशी सौहार्दानेच वागले पाहिजे. त्यांना त्रास होईल असे वर्तन तपासणी प्रतिनिधींनी करू नये.
-शेखर घोटणे,
अध्यक्ष, गॅस वितरक असोसिएशन
गॅस तपासणीसाठी ग्राहकांचा विरोध असण्याचे कारण नाही. तपासणीसाठी येताना ओळखपत्र व संबंधित गॅस वितरकांचे नाव सांगणे गरजेचे आहे परंतु तसे न करता चार-चार लोक येऊन आम्हाला नरेंद्र मोदींनी पत्र दिले आहे, असे सांगून तपासणीला विरोध केल्यास गॅस कार्डवर फुली मारून अरेरावीची भाषा वापरत आहेत. हे चुकीचे आहे.
- उदय पोतदार, गॅस ग्राहक