सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत सोडण्याच्या मागणीला जोर, रेल्वे प्रवासी संघटनांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 04:38 PM2024-12-02T16:38:41+5:302024-12-02T16:39:12+5:30
कोल्हापूर : कोरोना काळात बंद केलेली सह्याद्री एक्स्प्रेस तांत्रिक कारणामुळे मुंबईपर्यंत सोडण्यात असमर्थता दर्शविणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने ती गाडी ...
कोल्हापूर : कोरोना काळात बंद केलेली सह्याद्री एक्स्प्रेस तांत्रिक कारणामुळे मुंबईपर्यंत सोडण्यात असमर्थता दर्शविणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने ती गाडी विशेष रेल्वे म्हणून सह्याद्रीच्याच वेळेत पुण्यापर्यंत सोडण्याचा मध्यम मार्ग काढून प्रशासनाने प्रवासी आणि संघटनांचा रोष तात्पुरता थांबवण्यात यश मिळविले होते, मात्र आता या गाडीचे आरक्षण १ जानेवारीपासून घेतले जाणार नसल्याने ती ३१ डिसेंबरनंतर धावणार का याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत पूर्ववत सोडण्याची मागणी करून जोर लावला आहे.
कोरोना काळात बंद केलेली कोल्हापूर ते मुंबई ही सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत खासदार, आमदार आणि विविध संस्था तसेच संघटनांनी वारंवार रेल्वेमंत्री आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे; परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही गाडी सुरू करण्यासाठी संबंधितांनी असमर्थता दर्शवली होती; परंतु या गाडीच्याच वेळेनुसार ती कोल्हापूर ते पुणे अशी विशेष रेल्वे दि. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू केली; मात्र त्यानंतर ही गाडी सुरू ठेवणार का, ती मुंबईपर्यंत सोडणार का याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. पुणे-मुंबई दरम्यान सकाळच्या वेळी धावणारी, नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्ताने पुणे येथून जाणाऱ्या प्रवाशांची दीर्घकाळची गैरसोय कधी दूर होणार ? महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत धावणार का असे प्रश्न रेल्वे प्रवासी विचारत आहेत.
महालक्ष्मी एक्स्प्रेसवर ताण
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट विस्तारीकरण पूर्ण झाले तरी सह्याद्री एक्स्प्रेस सुरू झालेली नाही. त्यामुळे सध्या कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर प्रवाशांचा मोठा ताण आहे. या गाडीतून प्रवास करणाऱ्यांची कायम मोठी प्रतीक्षा यादी असते. त्यामुळे सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणारी ही विशेष रेल्वे पूर्ववत कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
विशेष रेल्वे १ जानेवारीपासून पुण्याबरोबरच मुंबईपर्यंत सोडल्यास महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील ताण २० टक्के तरी कमी होईल रेल्वेला अतिरिक्त महसूलही मिळेल. -जयेश ओसवाल, अध्यक्ष, अरिहंत जैन फाउंडेशन, कोल्हापूर.