जिल्हा बँकेच्या संचालिकेकडून हॉस्पिटलची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:41 AM2020-10-21T11:41:02+5:302020-10-21T11:44:48+5:30
crimenews, police, hospital, kolhapurnews दारात पार्किंग केलेली चारचाकी गाडी काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून युवकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दुपारी शनिवार पेठ पोस्टानजीक घडली.
कोल्हापूर : दारात पार्किंग केलेली चारचाकी गाडी काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून युवकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दुपारी शनिवार पेठ पोस्टानजीक घडली.
हल्ल्यात महिला डॉक्टर जयंता अभय पाटील, त्यांचा मुलगा विश्वजित (रा. २०२१, सी वॉर्ड, शनिवार पेठ) हे जखमी झाले. डॉक्टरांच्या तक्रारीनुसार जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांच्यासह १० ते १२ अज्ञातांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार पेठ पोस्टानजीक डॉ. जयंता पाटील यांचे माउली हॉस्पिटल आहे. मंगळवारी दुपारी उदयानी साळुंखे आपल्या गाडीतून शनिवार पेठ पोस्टानजीक कामानिमित्त गेल्या होत्या. चालकाने मोटार हॉस्पिटलच्या पार्किंगच्या आवारात थांबवली.
गाडी काढण्यावरून चालक व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा वाद झाला. गाडी मागे घेताना रुग्णालयाच्या दारातच बंद पडली. गाडीची सुरू राहिलेली रिव्हर्सची धून चालकाने वायर कापून बंद केली. या धूनच्या गोंगाटामुळे डॉ. पाटील यांना राग आला. त्यावेळी उदयानी साळुंखे तेथे आल्या. त्यांचाही डॉ. पाटील यांच्याशी वाद झाला. साळुंखे यांच्यासोबत आलेल्या १० ते १२ युवकांनी हॉस्पिटलवर हल्ला चढविला.
युवकांनी कन्सल्टिंग रूममध्ये शिरून डॉ. पाटील यांचा हात पकडला. त्यावेळी साळुंखे यांनी डॉक्टरना मारहाण केली. कन्सल्टिंग रूममधील पितळी घोडाही त्यांच्या उजव्या हातावर मारून त्यांना जखमी केले.
डॉक्टरांचा मुलगा विश्वजित हा सोडविण्यासाठी आला असता त्यालाही शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने युवक पांगले. या प्रकरणी डॉ. जयंता पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून साळुंखेंसह अज्ञात १० ते १२ जणांवर गुन्हा नोंद झाला.
साहित्याची मोडतोड
युवकांनी हल्ल्यात हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग रूममधील साहित्याची नासधूस केली. त्यामध्ये संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे, पितळी कुंड्या, खुर्च्यांची मोडतोड केल्याचे तक्रारीत म्हटले.