कोल्हापुरात ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेची ऊस तोडणी दरवाढीसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:28 PM2017-10-25T15:28:08+5:302017-10-25T15:34:07+5:30
राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कोल्हापुरात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेलाच; तसेच काही काळ लक्ष्मीपुरी मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.
कोल्हापूर ,दि. २५ : राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेलाच; तसेच काही काळ लक्ष्मीपुरी मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.
संघटनेचे प्रा. डॉ. सुभाष जाधव व प्रा.आबासाहेब चौगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांच्याशी चर्चा केली. यामध्ये प्रा. जाधव व चौगले यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. ऊस तोडणी व वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत सप्टेंबर २०१७ पासून राज्यात आंदोलन सुरू आहे.
उसाचा हंगाम तोंडावर असल्याने तत्पूर्वी तोडणी व वहातूक दरवाढीचा निर्णय व्हावा, यासाठी संघटना प्रयत्नशील होती. दरवाढीचा करार होणे अपेक्षित होते; पण राज्य सरकार व राज्य साखर संघ वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याने आंदोलन आक्रमक करावे लागत असल्याचे प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले. यावेळी दिनकर आदमापुरे, बाबासो कुरुंदवाडे, विलास दिंडे, भिवाजी शिंदे, राजाराम गौड, राजाराम परीट, लहू दिवसे, विलास केनवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या आहेत मागण्या :
- ऊस तोडणीचा दर प्रतिटन ३७८ रुपये करा.
- ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्केवाढ करा.
- मुकादमांच्या कमिशनचा दर २० टक्के करा.
- माथाडी बोर्डात ऊस तोडणी मजुरांचा समावेश करा.
- तीन लाखांच्या अपघात विम्याची कारखान्यांनी अंमलबजावणी करावी.
- बैलजोडीचा ७५ हजारांचा अपघात विमा लागू करा.
- यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना साडेतीन हजार दर द्या.