‘लव्ह जिहाद’ विरोधात निदर्शन
By admin | Published: September 14, 2014 11:23 PM2014-09-14T23:23:53+5:302014-09-15T00:09:13+5:30
संबंधितांवर कठोर गुन्हे नोंद करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
कोल्हापूर : ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू तसेच अन्य गैर इस्लामिक मुलींना प्रेमात फसवून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला जात आहे. हे रोखण्यासाठी देशात कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी करत राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे आज, रविवारी शिवाजी चौक येथे ‘लव्ह जिहाद’विरोधात तीव्र निदर्शने केली.
याप्रसंगी बजरंग दलाचे बंडा साळोखे म्हणाले, राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव या हिंदू तरुणीशी रकिबुल याने हिंदू असल्याचे भासवून फसवून तिच्याशी विवाह केला. तिला जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार पुढे आला आहे, असे षङ्यंत्र साऱ्या देशभर सुरू आहे. त्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शासनाने कठोर कायदा करण्यात यावा.
यासह महिलांवरील असे अत्याचार रोखण्यासाठी देशात विशेष कठोर कायदा लागू करावा. या कायद्यामध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदू, शिख, बौद्ध आदी मुस्लिमेतर धर्मातील मुलींच्या तक्रारीनुसार संबंधितांवर कठोर गुन्हे नोंद करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी किशोर घाटगे, संभाजी भोकरे, किरण कुलकर्णी, मानसिंग शिंदे, शशी बिडकर, शिवानंद स्वामी, प्रसाद कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, आदी उपस्थित होते.