आजऱ्यात शक्तिप्रदर्शन करत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:15+5:302021-05-03T04:19:15+5:30
आजरा : 'गोकुळ'च्या निवडणुकीसाठी आजरा तालुक्यातील २३३ पैकी २३२ म्हणजेच ९९.५७ टक्के ठरावधारकांनी मतदानाचा हक्क बजाविला. दोन कोरोनाबाधित ...
आजरा : 'गोकुळ'च्या निवडणुकीसाठी आजरा तालुक्यातील २३३ पैकी २३२ म्हणजेच ९९.५७ टक्के ठरावधारकांनी मतदानाचा हक्क बजाविला. दोन कोरोनाबाधित ठरावधारकांपैकी एकाने मतदान केले, तर दुसरा मतदानाला आलाच नाही. सत्तारूढ व विरोधकांनी मतदानासाठी ठरावधारकांना स्वतंत्र वाहनातून आणले होते. जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी आपल्या गटाच्या ठरावधारकांना स्वतंत्रपणे आणून मतदान केले.
सकाळी ८ वाजता व्यंकटराव हायस्कूलमधील चार मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. १० वाजता सत्तारूढ गटाचे ठरावधारक स्वतंत्र वाहनातून मतदानासाठी आले. त्यांच्या डोक्यावर 'गोकुळ चांगलं चाललंय' असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या होत्या. विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे, नामदेव नार्वेकर, अंकुश पाटील यांसह नेत्याने सर्व ठरावधारकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविले.
दुपारी १२ वाजता विरोधी गटाचे ठरावधारक चार मोठ्या वाहनांतूनतून मतदानस्थळी आले. त्यांनी डोक्यावर पिवळी टोपी घालून, तोंडाला पिवळे मास्क लावले होते. विरोधी उमेदवार अंजना रेडेकर, वसंतराव धुरे, अभिषेक शिंपी, अनिरुद्ध रेडेकर, जयवंत शिंपी, सुधीर देसाई, मुकुंद देसाई यांनी ठरावधारकांना मतदान केंद्रात नेऊन सोडले.
जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी आपल्या ठरावधारकांना आपल्या वाहनातून आणून स्वतंत्रपणे मतदान केले. २३३ पैकी जवळपास ३३ ठरावधारकांनी स्वतंत्रपणे येऊन मतदान केले. पंचायत समितीसमोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते दिवसभर एकमेकासमोर बसून होते.
आजऱ्यातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच 'गोकुळ'चे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे व विरोधी गटाच्या उमेदवार अंजना रेडेकर हे ठाण मांडून बसून होते. सकाळी विरोधी गटाच्या उमेदवार सुस्मिता राजेश पाटील यांनी, तर दुपारच्या सत्रात माजी खासदार धनंजय महाडिक व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली.
मतदान केंद्रावर सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, तहसीलदार विकास अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
मतदानानंतर आकडेमोडीची चर्चा रंगली...
कोणाच्या गाडीतून कोण मतदानासाठी आले? कोणी पॅनेल सोडून मतदान केले? राष्ट्रवादी व काँग्रेससह रेडेकर गटाचा मतदानाचा आकडा किती? शिंपी व चराटी गटाचे ठरावधारक किती? रवींद्र आपटे यांना पॅनेलकडून तालुक्यातून किती? मताधिक्य मिळणार? याची चर्चा रंगली होती.
ठरावधारकांनी मतदानापूर्वी आपटेंना केला नमस्कार
मतदानासाठी सकाळी १० वाजता सत्तारूढ गटाचे ठरावधारक मतदानस्थळी स्वतंत्र वाहनातून आले. मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी सर्व ठरावधारकांनी गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांना नमस्कार करून, आम्ही पॅनेलशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. काही ठरावधारकांनी स्वतंत्रपणे मतदानास जाण्यापूर्वी आपटे यांची भेट घेतली.
कोरोनाबाधित ठरावधारकांचे मतदान
आजरा तालुक्यातील महागोंड येथील दोन ठरावधारक कोरोनाबाधित आहेत. एक ठरावधारक होम क्वारंटाईन असल्याने त्यांनी पीपीई कीट घालून मतदान केले. दुसरा ठरावधारक कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते आले नाहीत.
--------------------------
..........
एकूण मतदान : २३३
झालेले मतदान : २३२
९९ टक्के
फोटो ओळी :
आजऱ्यातील मतदान केंद्रावर ‘गोकुळ’चे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे मतदान करताना.
क्रमांक : ०२०५२०२१-गड-१४
२) ‘गोकुळ’साठी सत्तारुढ गटाचे समर्थक पांढऱ्या टोप्या घालून मतदानासाठी येताना.
क्रमांक : ०२०५२०२१-गड-१३
३). विरोधी गटाचे समर्थक पिवळ्या टोप्या व मास्क घालून मतदानासाठी येताना.
क्रमांक : ०२०५२०२१-गड-१२