भेंडवडेतील वारणा नदीत यांत्रिक बोटीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:46+5:302021-06-09T04:31:46+5:30
खोची : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे संभाव्य पूरस्थितीत यांत्रिक बोट कशी हाताळून मदतकार्य कसे करावयाचे त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात ...
खोची : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे संभाव्य पूरस्थितीत यांत्रिक बोट कशी हाताळून मदतकार्य कसे करावयाचे त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जीवनज्योती रेस्क्यू फोर्स आळते येथील स्वयंसेवकांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले. मंडल अधिकारी गणेश बर्गे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, तलाठी सुरेश खोत, उपसरपंच डॉ. संजय देसाई, सुहास देसाई, पोलीस पाटील विलास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रात्यक्षिक झाले.
वडगाव मंडलमधील भादोले, लाटवडे, भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार या गावांना पुराचा फटका बसत असतो. त्याची दखल घेत या गावांसाठी यांत्रिक बोट देण्यात आलेली आहे. वारणा नदीपात्रात भेंडवडे ते खोची व भेंडवडे ते लाटवडेपर्यंत हे यांत्रिक बोटीतून प्रवास करत पूर परिस्थितीत मदतकार्य कसे करावयाचे याची माहिती देण्यात आली.
अनेकवेळा भेंडवडे, खोची येथील लोकवस्तीत पुराचे पाणी शिरते. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवताना बऱ्याच अडचणी येतात. यांत्रिक बोटीमुळे मदत करण्याचे कार्य सोपे होते. यावर्षी संभाव्य महापूर परिस्थिती निर्माण झाली तर सुरक्षितता म्हणून शासन सक्रिय झाले आहे.
यावेळी जीवन ज्योती रेस्क्यू फोर्स चे सुनील जाधव, हनुमान कुलकर्णी, स्वाती भोसले, प्रतीक्षा माने ,सागर परीट आदी उपस्थित होते.
फोटो ओळी-भेंडवडे येथे वारणा नदीत संभाव्य पूरस्थिती मदतकार्य संदर्भात यांत्रिक बोटीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जीवन ज्योती रेस्क्यू फोर्सचे कार्यकर्ते, मंडल अधिकारी गणेश बर्गे, सुरेश खोत, संतोष चव्हाण,डॉ. संजय देसाई,सुहास देसाई यामध्ये सहभागी झाले.