सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने
By admin | Published: January 29, 2016 11:17 PM2016-01-29T23:17:16+5:302016-01-29T23:51:34+5:30
यंत्रमाग कामगार संघटना : किमान वेतनाची मागणी
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांसाठी राज्य शासनाने जारी केलेल्या किमान वेतनाच्या अध्यादेशाला एक वर्ष होऊनही अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे शुक्रवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तर लाल बावटा सायझिंंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले.२९ जानेवारी २०१५ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य शासनाकडून सुधारित किमान वेतन जाहीर करण्यात आले. त्याला मालक प्रतिनिधी संघटनांनी विरोध केला असला तरी न्यायालयाने अंमलबजावणीस स्थगिती दिलेली नाही. असे असताना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सुधारित किमान वेतन जाहीर झाल्यानंतरही त्यापेक्षा कमी वेतन दिलेल्या मालकांच्या विरोधात फरकाचे दावे दाखल केले आहेत. त्याची अद्याप सुनावणी सुरू करण्यात आलेली नाही, अशा मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी शुक्रवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करीत शासनाचा निषेध केला. आंदोलनात दत्ता माने, शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, परशराम आगम, आनंदा गुरव, सुनील बारवाडे, शिवानंद पाटील, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.तसेच लाल बावटा सायझ्ािंंग- वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, कृष्णात कुलकर्णी, मारुती जाधव, सूर्यकांत शेंडे, दशरथ जाधव, महादेव बरुर, आदींसह कामगार सहभागी झाले होते. (वार्ताहर)
मुंबई येथे बैठकीत ‘आयटक’चा इशारा
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांचे किमान वेतन, कल्याणकारी मंडळ, आदींसह सर्वच प्रश्नांकडे सध्याचे भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. तरी आयटक कामगार संघटनेच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय आयटक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सचिव शाम काळे (नागपूर) होते.
राज्यातील यंत्रमाग क्षेत्रामधील आयटक पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथील रुपेश गुप्ता भवन येथे झाली. यावेळी सर्वच वक्त्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांचा मेळावा आयोजित करून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घ्यावा, असे सूचित केले आणि त्याप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीमध्ये हणमंत लोहार, अशोक गोपलकर, विजय कांबळे, मक्सूद अन्सारी, फैय्याज अन्सारी, आदींनी आपले विचार मांडले.