मदतीतील दुजाभावाबद्दल बांधकाम कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 06:46 PM2021-05-20T18:46:58+5:302021-05-20T18:47:36+5:30
Labour Kolhapur : कोविड अनुदानासह प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करून शासन दुर्लक्ष करत असल्याने वैतागलेल्या बांधकाम कामगारांनी लॉकडाऊन असतानाही गुरुवारी आपापल्या घरांसमोरूनच सुरक्षित अंतर ठेवून निदर्शने केली. निवेदनही ऑनलाईन पद्धतीनेच मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री यांना पाठविण्यात आले.
कोल्हापूर : कोविड अनुदानासह प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करून शासन दुर्लक्ष करत असल्याने वैतागलेल्या बांधकाम कामगारांनी लॉकडाऊन असतानाही गुरुवारी आपापल्या घरांसमोरूनच सुरक्षित अंतर ठेवून निदर्शने केली. निवेदनही ऑनलाईन पद्धतीनेच मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री यांना पाठविण्यात आले.
सिटू प्रणीत बांधकाम कामगार संघटनेने राज्यपातळीवर हे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरात संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे व जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत आंदोलन झाले. कोविड अनुदानात होणाऱ्या दुजाभाव, वशिलेबाजी आणि बोगसगिरीकडे संघटनेने मागण्यांतून लक्ष वेधले आहे.
मागील लॉकडाऊन काळात दोन हजार मिळाले, त्यांनाच आता दीड हजार मिळत आहेत. वास्तविक पाहता हा लाभ सर्वच नोंदीत अधिकृत कामगारांना होणे अपेक्षित होते; पण तसे होताना दिसत नसल्याने लाभापासून वंचित असलेल्या खऱ्या कामगारांमध्ये असंतोषाची भावना पसरली आहे.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश कुंभार, भगवान घोरपडे, संदीप सुतार, विक्रम खतकर, आनंदा कराडे, कुमार कागले, रामचंद्र निर्मळे, शिवाजी मोरे, आदींनी प्रयत्न केले.