कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 04:09 PM2019-02-15T16:09:15+5:302019-02-15T16:11:58+5:30
शिवाजी मार्केट येथील भाजी मंडईतील गैरसोर्इंकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी येथील विक्रेत्यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर विक्रेत्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
कोल्हापूर : शिवाजी मार्केट येथील भाजी मंडईतील गैरसोर्इंकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी येथील विक्रेत्यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर विक्रेत्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
शिवाजी मार्केट येथील पहिल्या माळ्यावर भाजी मंडई बसविण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी अनेक गैरसोई आहेत. अस्वच्छता आहे. पाण्याची सोय नाही. वरील मजल्यावर हे भाजी मंडई असल्याने आजबाजूच्या परिसरातील नागरिक या मंडईत जात नाहीत. त्यांनी पाठ फिरविल्यामुळे येथील विक्रेत्यांनी भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, माळकर तिकटी, राजाराम रोड, महापालिकेची पश्चिम बाजू, ऋणमुक्तेश्वर मार्केट अशा ठिकाणी स्थलांतर केले आहे. आज या मंडईची अवस्था फार वाईट झाली आहे.
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी विक्रेत्यांनी महापालिकेसमोर निदर्शने केली. त्यानंतर त्यांनी महापौर कार्यालयात जाऊन उपमहापौर भूपाल शेटे यांना निवेदन दिले. शिवाजी चौकाच्या बाजूने १0 फूट रुंद जीना उभारून नागरिकांची सोय करावी, अशी मागणीही निवेदनात भाजी विक्रेते व कांदा-बटाटा विक्रेत्यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सलीम बागवान, समीर बागवान, फिरोज शेख, तस्लीम बागवान, बबलू कल्याणकर, इरफान शेख, दीपक बुटिया, राजू अपराध, विशाल बसाप्पा, आदी ५० हून अधिक विक्रेत्यांनी निदर्शनात भाग घेतला.