दानवेंच्या वक्तव्याने जिल्ह्यात दाणादाण
By admin | Published: May 12, 2017 12:27 AM2017-05-12T00:27:53+5:302017-05-12T00:27:53+5:30
संतप्त पडसाद : प्रतीकात्मक पुतळा दहनासह काळे फासले; निषेधार्थ घोषणाबाजी; राजीनाम्याची मागणी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना येथे बुधवारी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त आणि बेताल वक्तव्याचे संतप्त पडसाद आज, गुरुवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी उमटले. शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. प्रतीकात्मक पुतळ्याला काळे फासत, दहन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही ठिकाणी
जोडा मारो आंदोलनही करण्यात आले.
कोल्हापुरात शिवसेनेने फासले काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरात गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिवसेनेतर्फे काळे फासण्यात आले. मिरजकर तिकटी येथे शिवसैनिकांनी त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसैनिकांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास निदर्शनाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘तूर शेतकऱ्यांच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या दानवे यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला काळे फासले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दानवे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपुगडे, अनिल पाटील, दिलीप देसाई, अमोल पोवार, शशी बिडकर, शुभांगी पोवार आदी सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी काळे फासताना शिवसैनिक आणि पोलिसांत झटापट झाली.
इचलकरंजीत जोडा मारो आंदोलन
इचलकरंजी : इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडा मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पुतळा काढून घेताना पोलीस व आंदोलक यांच्यात झटापट झाली. यावेळी शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्ये करून त्यांचा अवमान केल्याबद्दल दानवे यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडा मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, महादेव गौड, मधुकर पाटील, बाबूराव पाटील, सयाजी चव्हाण, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘आप’कडूनही निषेध
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा आम आदमी पक्षातर्फे (आप) गुरुवारी तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. दानवे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाने केली आहे. नारायण पोवार, संदीप देसाई, उत्तम पाटील, नाथाजी पोवार, आदींनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.