दूधदर, एफआरपीसाठी शेतकरी संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:03 PM2020-08-20T19:03:44+5:302020-08-20T19:04:40+5:30
दूधदरातील वाढीसह एफआरपी फरकाची रक्कम, पीककर्ज आणि वनकायद्यातील दुरुस्तीच्या मागणीसाठी गुरुवारी दुपारी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. नायब तहसिलदार आनंद गुरव यांना मागण्यांचे निवेदन देऊन यात गांभिर्याने लक्ष घालण्याची विनंतीही केली.
कोल्हापूर: दूधदरातील वाढीसह एफआरपी फरकाची रक्कम, पीककर्ज आणि वनकायद्यातील दुरुस्तीच्या मागणीसाठी गुरुवारी दुपारी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. नायब तहसिलदार आनंद गुरव यांना मागण्यांचे निवेदन देऊन यात गांभिर्याने लक्ष घालण्याची विनंतीही केली.
शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. लॉकडाऊन काळात शेतमाल उत्पादन सुरु आहे, पण त्याचा खर्च पण आवाक्याच्या बाहेर जात आहे. गाईच्या दुधाचा खरेदी दर ३० रुपये लिटरचा शासनाचा आदेश असतानाही दूध संघाकडून कमी दराने खरेदी करुन दूध उत्पादकांची लूट होत आहे. शासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय एफआरपीच्या फरकाची रक्कम अद्यापही कारखान्यांनी दिलेली नाही. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असतानाही सरकारने व प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने ऊस उत्पादक अडचणीत आहे. पीककर्ज देतानाही बँकाकडून अडवणूक होत आहे. राष्ट्रीय बँकांनी निदान रब्बीसाठी तर धोरण बदलावे यासाठी शासनाने त्यांना सुचना कराव्यात. वन कायद्यातील जाचक नियमामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
वन्यजीवाकडून मोठ्याप्रमाणार पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई मिळत नाही. यात गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज आहे, अशा मागण्या करण्यात आल्या. यात डी.एस.पाटील, संभाजी चौगले, ज्ञानदेव पाटील, विनोद कुसाळ, गुणाजी शेलार, के.बी.फुटाळे, बाळासो मिरजे, राजू खुरदाळ आदिनी सहभाग घेतला.