सीपीआरमध्ये परिचारिकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:30+5:302021-08-12T04:27:30+5:30
कोल्हापूर : परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्यांचे धोरण शासनाने रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र गर्व्हेन्मेंट नर्सेस असोसिएशनच्यावतीने मंगळवारी सकाळी येथील राजर्षी ...
कोल्हापूर : परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्यांचे धोरण शासनाने रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र गर्व्हेन्मेंट नर्सेस असोसिएशनच्यावतीने मंगळवारी सकाळी येथील राजर्षी छ. शा. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेशाचे निर्देश पाळून हे आंदोलन करण्यात आले.
कोविड-१९ संसर्गाच्या कालावधीत परिचारिका अत्यंत समर्पणाने आणि दीड वर्षे सातत्याने रुग्णसेवेत आहेत. शासनाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने परिचारिकांना फ्रंटलाईन वर्कर (कोविड योद्धा) म्हणून शासनाने कोविड भत्ता दिला नाही, पण याउलट राज्यातील २५ टक्के परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे धोरण शासनाने आखून परिचारिकांचे खच्चीकरण केले आहे. त्यामुळे प्रशासकीय बदल्या रद्द करून विनंती बदल्या रिक्त पदावर कराव्यात, तशी धोरणात तरतूद करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
सकाळी सीपीआर रुग्णालयाच्या आवारातील रा. छ. शा. म. शा. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर परिचारिकांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. जमावबंदीचा आदेश असल्याने ते निर्देश पाळत हे आंदोलन केले. हे आंदोलन नर्सेस असोसिएशनचे अध्यक्ष हसमत हवेरी यांच्या सूचनेनुसार केले. आंदोलनात सचिव संदीप नलवडे, कार्याध्यक्ष संतोष गडदे, कोषाध्यक्ष पूजा शिंदे, कार्यकारिणी सदस्या सुजाता उरुणकर आदी उपस्थित होते.