खराब रस्त्यांप्रश्नी ‘जनशक्ती’ची निदर्शने
By Admin | Published: December 29, 2014 10:57 PM2014-12-29T22:57:52+5:302014-12-29T23:35:48+5:30
निदर्शने सुरू असताना कोणीही अधिकारी आंदोलकांसमोर यायला तयार नव्हते
कोल्हापूर : शहरातील खराब झालेले अंतर्गत रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी ठेकेदारांवर सोपवावी, या मागणीसाठी आज, सोमवारी कोल्हापूर जनशक्ती संघटनेतर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. जनशक्तीचे कार्यकर्ते सकाळी साडेअकरा वाजता महानगरपालिकेसमोर जमले. त्यानंतर त्यांनी निदर्शने सुरू केली. निदर्शने सुरू असताना कोणीही अधिकारी आंदोलकांसमोर यायला तयार नव्हते, त्यामुळे आंदोलकांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखले. थोड्या वेळाने नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत, उपनगर अभियंता एम. एम. निर्मळे यांनी आंदोलकांसमोर जात त्यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदनही स्वीकारले.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे इंधन, गाड्यांचे, तसेच वेळेचे नुकसान होत आहे. खड्डे आणि धुुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अनेक नागरिकांना मानेचा, पाठीच्या मणक्यांचा, तसेच डोळ्याचे, श्वसनाचे आजार झाले आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता ज्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, ती तातडीने करून घेण्यात यावीत, रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष देऊन रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांवर सोपवावी, ज्या रस्त्यांचा नूतनीकरणात समावेश झालेला नाही, त्यांना तातडीने निधी देऊन त्याच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशा मागण्या संघटनेने निवेदनात केल्या आहेत.
निदर्शनाचे नेतृत्व समीर नदाफ, अरुण अथणे, तय्यब मोमीन, केशव स्वामी, राजन पाटील, दिलीप पाटील, बाळासो शाळीबिद्रे, नियाज खान, मधुकर पाटील, नियाज कागदी, विवेक वोरा, संतोष आचरे, मुसाभाई पटवेगार, आदींनी केले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)