यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी भटक्या-विमुक्तांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 05:28 PM2020-03-12T17:28:33+5:302020-03-12T17:29:44+5:30
कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी ...
कोल्हापूर : भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुुरुवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माजी उपपंतप्रधान लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजबांधवांनी हे आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी व हलगी-घुमक्याच्या आवाजाने परिसर दणाणून गेला.
संघटनेचे अध्यक्ष भीमराव साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत समाजबांधवांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कार्यकर्त्यांची पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी ठरली.
यानंतर शिष्टमंडळाने जाऊन जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागण्या अशा : समाजकल्याण विभागाकडील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत टोप व पारगाव (ता. हातकणंगले) येथील गोपाळ समाजाच्या वसाहती बांधण्याकरिता दोन वर्षांपूर्वी निर्णय होऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही.
भटक्या-विमुक्तांसाठी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी त्यांना घर बांधून त्यांचे पुनर्वसन करावे, यासाठी ‘जिथे झोपडी तिथे घर’ अभियान राबविण्यात यावे. नागाव (ता. हातकणंगले) व वसगडे (ता. करवीर) येथील गोपाळ व नंदीवाले समाजाच्या झोपड्या असलेल्या जागेच्या ग्रामपंचायतीत नोंदी घालून त्यावर योजनेतून घर बांधावे असा निर्णय झाला आहे; परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
भटक्या जमातीच्या विकासासाठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाची सर्व थकीत कर्जे माफ करावीत. भटक्या जमातीमधील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करणारे उपक्रम सुरू करावेत. आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय धोंगडे, अमित गायकवाड, युवराज पोवार, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.