माध्यमिक शिक्षक संघाची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 04:10 PM2020-01-24T16:10:06+5:302020-01-24T16:10:50+5:30
माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तर दिरंगाई, मनमानी आणि गलथान कारभाराचे अनेक शिक्षक बळी ठरत असल्याचा आरोप जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. शिक्षकांवरील अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून पिढीत शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली.
कोल्हापूर : माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तर दिरंगाई, मनमानी आणि गलथान कारभाराचे अनेक शिक्षक बळी ठरत असल्याचा आरोप जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. शिक्षकांवरील अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून पिढीत शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली.
पिढीत शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिर्घ काळापासून होत असणाऱ्या अन्यायाबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना वेळोवेळी निवेदने दिल्यानंतर आदेश होऊन न्याय मिळालेला नाही.
कणेरीमठ येथील काडसिद्धेश्वर शाळेतील पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करत तिल्लोत्तमा सोनवणे यांना अतिरिक्त शिक्षक ठरवले. टोप येथील शाळेत समायोजन करण्याचे आदेश बदलत कांडगाव हायस्कूल येथे समायोजन केल्याचे नवे आदेश काढले.
जे आदेश त्यांना अद्यपाही मिळालेले नाहीत. अशा विविध कारणांनी १३ शिक्षक पिढीत आहेत. यांच्याबाबत न्यायालयाकडून सुस्पष्ट आदेश होऊनही त्याची अंमलबजावणी झालेल्या नाही. त्यांना थातूरमातुर कारणे सांगण्याबरोबरच उद्धट वागणुक दिली जात आहे.
यामधील बहुसंख्य तक्रारी या शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याशी निगडीत आहेत. ते हेतुपुरस्सर कर्तव्यात कसूर करत आहेत. वरीष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून पिढीत शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. यावेळी शिक्षक संघटनेचे बी.एस. खामकर, सुरेश खोत, रविंद्र देसाई, शिवलता फुटाणे आदी उपस्थित होते.