शहर, जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनियाचा फैलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:54+5:302021-06-21T04:17:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनापाठोपाठ शहर आणि जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनापाठोपाठ शहर आणि जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डासांची उत्पत्ती स्थान नष्ट करणे आणि डासांपासून बचाव करण्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आरोग्य प्रशासनाने आवाहन केले आहे.
दोन महिन्यांपासून शहर, जिल्ह्यात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. या आजाराने मृत होणाऱ्यांची संख्याही दोन अंकी आहे. अशातच डेंगी, चिकनगुनिया अशा साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. शुक्रवारी कळंबा येथे एका महिलेचा डेंगी सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनातही खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासन त्या महिलेचा नेमका कोणत्या आजाराने मृत्यू झाला, याचा शोध घेत आहे.
सध्या कळंबा, उचगाव, पुलाची शिरोली, मुडशिंगी, कणेरी, सांगवडे, सांगवडेवाडी, शिरोळ, कागल येथे डेेंगी आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जिल्हा हिवताप विभागाचे अधिकारी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनजागृती करीत आहेत. जास्त दिवस पाण्याची साठवणूक करू नये, घर आणि परिसरातील डासांची उत्पत्तीस्थान नष्ट करावेत, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदानीचा वापर करावा, अशी जागृती केली जात आहे. पण जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने पाणी साठून राहण्याचे आणि दलदलीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गटारांचीही नियमित स्वच्छता न झाल्याने डास कमी होत नसल्याचे चित्र आहे.
चौकट
उपनगरातही
सदरबाजार, जवाहरनगर, सुभाषनगर, जागृतीनगर, टेंबलाईवाडी, शाहू मिल कॉलनी येथे डेंगी, चिकनगुनिया आजाराचा फैलाव गतीने होत आहे. घरात साठवून ठेवलेल्या पाण्यात आणि घराशेजारी असलेल्या दुचाकी, चारचाकीचे टायर, प्लॅस्टिक, पत्र्याच्या डब्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात डास तयार होत आहेत. यामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढते आहे.
कोट
शहर, उपनगरे आणि जिल्ह्यातील काही गावांत डेंगी, चिकनगुनियाचे रुग्ण सापडत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने डासही वाढले आहेत. परिणामी साथीच्या आजाराचाही प्रसार होत आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. घर, परिसराची स्वच्छता राखावी. डासांपासून बचाव करून घ्यावा. डबक्यातील पाण्यात डास तयार होऊ नये, यासाठी गप्पी मासे सोडावेत.
डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी