कोल्हापूर शहरात डेंग्यूचा फैलाव,२० रुग्ण आढळले : महापालिका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:51 AM2017-11-22T00:51:19+5:302017-11-22T00:52:45+5:30
कोल्हापूर : शहर परिसरात गेल्या आठ दिवसांत डेंग्यूचे २० रुग्ण आढळल्यामुळे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
कोल्हापूर : शहर परिसरात गेल्या आठ दिवसांत डेंग्यूचे २० रुग्ण आढळल्यामुळे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यासंदर्भात पंचगंगा रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय अधिकाºयांच्या बैठकीत पुढील काळात करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. तातडीने घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्याधिकारी डॉ. अजित वाडेकर होते.
गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येऊ लागल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर आरोग्याधिकारी डॉ. वाडेकर यांनी तातडीने मंगळवारी पंचगंगा रुग्णालयात महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकाºयांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे, नोडल आॅफिसर डॉ. अमोलकुमार माने यांच्यासह सर्व अकरा केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत डेंग्यू आजारांच्या रुग्णाबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी शहरातील जुना बुधवार पेठ, सीपीआर हॉस्पिटल हॉस्टेल, मंगेशकरनगर, कनाननगर, जवाहरनगर येथून काही रुग्णांनी सीपीआर हॉस्पिटल तसेच खासगी रुग्णालयांत उपचार घेतले आहेत. त्यापैकी गेल्या आठ दिवसांत तब्बल २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती समोर आली.
डेंग्यूचे डास कसे तयार होतात?
डेंग्यूचे डास प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात अळ्या घालतात.
गच्चीवर, परिसरात साचलेल्या पाण्यात अळ्या घालतात
डासांपासून रोगजंतूंचा प्रसार होतो.
डेंग्यूचे डास हे दिवसा चावा घेतात.
डेंग्यूची लक्षणे
सुरुवातीला जोराचा ताप येतो.
अचानक थंडी वाजायला लागते.
तीव्र स्वरूपाची अंगदुखी सुरू होते.
डोळ्याच्या मागील बाजूची डोकेदुखी.
अंगावर लालसर पुरळ उठतात.
रक्तातील प्लेटलेट कमी होतात.
डेंग्यूचे २० रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य उपचार व खबरदारीने आपण त्यावर मात करू शकतो. नागरिकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे खबरदारी घ्यावी व महापालिकेस सहकार्य करावे.
- डॉ. अरुण वाडेकर, आरोग्याधिकारी मनपा.