जिल्ह्यात डेंग्यूचे सावट

By admin | Published: October 29, 2014 12:37 AM2014-10-29T00:37:55+5:302014-10-29T00:44:57+5:30

प्रशासन सज्ज : आतापर्यंत ३२ रुग्ण, सीपीआर’च्या शिकाऊ डॉक्टरलाच लागण

Dengue fever in the district | जिल्ह्यात डेंग्यूचे सावट

जिल्ह्यात डेंग्यूचे सावट

Next

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामधील (सीपीआर) शिकाऊ डॉक्टराला डेंग्यूची लागण झाल्याचे समजते. सध्या या डॉक्टरला डिस्चार्ज देण्यात आला आहे; पण त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सीपीआरमध्ये बोरिवडे (ता. पन्हाळा) व पाचुर्डे (ता. भुदरगड) येथील दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, या दोघांना डेंग्यू नसल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, सीपीआर रुग्णालय व कोल्हापूर महापालिका प्रशासन सज्ज झाले असून, प्रशासनाने नागरिकांनी आजाराबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
‘सीपीआर’मध्ये डेंग्यूची लागण झालेले एप्रिल ते आज, मंगळवारअखेर ३२ रुग्ण होते. त्यापैकी ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बोरिवडे व पाचुर्डे येथील दोन रुग्ण आहेत. हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून पर्यटक आहेत. त्यांना त्याठिकाणी डेंग्यूची लागण झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये आठवड्यामधून दोन दिवस जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पाण्याच्या साठ्याची तपासणी करीत आहे. त्याचबरोबर एकात्मिक रोग सर्वेक्षण पथक (आयडीएसपी) तयार केले आहे. या पथकात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अशा एकूण चौघाजणांचा समावेश आहे. हे पथक आरोग्य विभागावर सनियंत्रण ठेवते. (प्रतिनिधी)

महापालिका सतर्क
महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये गेल्या सात ते आठ महिन्यांत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. सध्या शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तर महापालिकेला कळवावे, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले असून, महापालिका प्रशासन उपाययोजनेसाठी सतर्क असल्याचे सांगितले.

डेंग्यू नाही; मात्र काळजी घ्या : महापालिकेचे आवाहन
पावसाळ्यानंतर दूषित पाण्यापासून हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू ताप, चिकनगुनिया यासारखे रोग पसरण्याचा धोका निर्माण होतो. राज्यभर हिवताप व डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांत वाढ होत असतानाच कोल्हापुरातही असे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शहरात डेंग्यूसदृश आजार नसल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी सावध राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी याच कालावधीत हिवताप व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. औद्योगिकीकरणाच्या वाढीमुळे सुमारे एक लाखापेक्षा अधिक संख्येने जिल्ह्यात परराज्यातून मजूर आले आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गोवा, आदी भागातील हिवतापग्रस्तांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या परिसरात बराच कालावधी वास्तव्य करून आलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असते.
शहरी भागातही डेंग्यूसदृश आजारांचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. हिवताप रुग्णांची तपासणी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात, तर डेंग्यूची तपासणी ‘सीपीआर’मध्ये करण्याची सोय आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Dengue fever in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.