कोल्हापूर शहरात १५ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या,: चार नवीन रुग्ण, घरोघरी सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:00 AM2017-12-01T01:00:43+5:302017-12-01T01:03:02+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गुरुवारपासून डेंग्यू सर्वेक्षण मोहीम अधिक व्यापक करण्यात आली. शहराच्या विविध भागांत एकाच दिवसात १ हजाराहून अधिक घरांत महापालिकेची पथके पोहोचली. सुमारे पंधरा घरांतील साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने तेथील पाणीसाठे नष्ट करण्यात आले, तर खासगी रुग्णालयांत आणखी चार नवीन रुग्ण दाखल झाल्याने ही संख्या वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापौर हसिना फरास यांनी दोन दिवसांपूर्वी डेंग्यूच्या उपाययोजनांसंदर्भात बैठक घेऊन महापालिका प्रशासनाला सूचना दिल्यानंतर आरोग्य विभागामार्फत गुरुवारपासून शहरात डेंग्यू सर्वेक्षणाची धडक मोहीम सुरू केली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता पाच पथके तयार केली असून, या प्रत्येक पथकात वीस कर्मचाºयांचा समावेश आहे.
रुग्णांची तपासणी, घरातील पाणीसाठे तपासणी, परिसराची स्वच्छता आणि आवश्यकता वाटल्यास रक्ताचे नमुने घेणे अशी सर्व कामे या पथकामार्फत एकाच वेळी केली जाणार आहेत. या मोहिमेत पथक नियंत्रण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम., जी.एन.एम. कर्मचारी, ‘आशा’ स्वयंसेविका, कीटकनाशक विभागाकडील कर्मचारी तसेच, आरोग्य स्वच्छता विभागाकडील कर्मचारी यांचा समावेश आहे.
गुरुवारी शहरातील जवाहरनगर, मंगेशकरनगर, भक्तिपूजानगर, शुक्रवार पेठ, जुना बुधवार पेठ, सदर बझार, कनाननगर, टेंबलाई नाका, महाडिक माळ, शिवाजी पेठ व सी.पी.आर. कॅम्पस् हे भाग प्रथम प्राधान्याने व युद्धपातळीवर डेंग्यू सर्वेक्षण मोहिमेकरिता महापालिकेतर्फे हाती घेतले.सुमारे ९५० ते १००० घरांची तपासणी केली. त्यावेळी पंधरा घरांतील पाण्याचा साठा असलेल्या टाक्यांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे तत्काळ ते पाणीसाठे रिकामे करण्यात आले.
ही मोहीम ‘डेंग्यूमुक्त कोल्हापूर’ या उद्देशाने राबविण्यात येणार असून, आपल्या भागात येणाºया आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचाºयांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी केले आहे.
प्रत्येकाची जबाबदारी ...
शहरात डेंग्यूच्या आजारास आळा घालायचा असेल, तर प्रत्येक कुटुंबाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहेच. तरीही प्रत्येक कुटुंबाने खबरदारी घेतली पाहिजे. डेंग्यूचे डास हे घराभोवतीचे पाणीसाठे, पाण्याची पिंपे, नारळाच्या करवंट्यांतील पाणी यामध्ये अंडी घालतात. प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरात तसेच परिसरात लक्ष ठेवून अळ्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे.