डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढल्याने रक्ताची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:53 AM2021-06-23T11:53:37+5:302021-06-23T11:56:20+5:30
BloodBank Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नियोजित शस्त्रक्रिया प्रलंबित राहिल्या होत्या. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये गर्दी होत आहे. कॅन्सर, हाडाचे आजार, प्रसूती, अपघातामुळे रुग्ण वाढले असून आता हॉस्पिटलमधून रक्ताची मागणी होऊ लागली आहे. त्यात कोरोनामुळे रक्तदात्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने सध्या सगळीकडे रक्ताची टंचाई भासत आहे. यासाठी आता रक्तदानाची गरज असून रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कधी रक्तदान करावे
- कोरोना प्रतिबंध लसीकरणानंतर चौदा दिवसांनंतर
- कोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी
- पुरुषांनी दर तीन महिन्याला
- महिलांनी दर चार महिन्याला
शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि रक्तदान
मानवी शरीरात (१८ ते ६५ वयोगटातील व ४५ किलोपेक्षा अधिक वजन) ५ ते ६ लिटर रक्त असते. त्यातील ५ टक्के म्हणजेच ३५० ते ४५० मिली रक्त एका वेळी घेतले आहे.
महिलांचे रक्तदानाचे प्रमाण ७ टक्के
रक्तदानाची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर देशात ७ टक्केच महिला रक्तदान करतात. रक्तदानाची मानसिकता असते. मात्र, फास्ट फूडचे सेवन, सकस आहार व व्यायामाचा अभाव, अनियमित मासिक पाळीमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप कमी असते.
जिल्ह्यात २५० थॅलेस्मियाचे रुग्ण
थॅलेस्मिया, डायलेसिस रुग्णांना महिन्याला रक्त द्यावे लागते. जिल्ह्यात २५० हून अधिक ह्यथॅलेस्मियाह्णचे रुग्ण असल्याने त्यांना मोफत रक्तपुरवठा करावा लागतो.
जून महिन्यात एक हजार प्लेटलेटची मागणी
यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने सुरुवात केली होती. त्यात ऊन-पावसामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले. जून महिन्यात जिल्ह्यात एक हजार प्लेटलेटची मागणी विविध रक्तपेढ्यांतून झाली.
लोकमतने नेहमीच सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवले. सध्या रक्ताची टंचाई ओळखून राज्यभर रक्तदानाची मोहीम राबवण्याचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.
- प्रकाश घुंगूरकर ,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन