‘आशां’कडून डेंग्यू रुग्णांचा फुकट सर्व्हे -: आरोग्य विभागाकडून ‘आशां’ना सक्तीने काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 01:11 AM2019-07-05T01:11:41+5:302019-07-05T01:12:12+5:30
‘आशां’कडून कोणतेही काम विनामोबदला करून घ्यायचे नाही, असे शासन आदेश असतानाही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत डेंग्यू रुग्णांचे सर्व्हे ‘आशां’कडून फुकटात करून घेतले जात आहेत.
कोल्हापूर : ‘आशां’कडून कोणतेही काम विनामोबदला करून घ्यायचे नाही, असे शासन आदेश असतानाही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत डेंग्यू रुग्णांचे सर्व्हे ‘आशां’कडून फुकटात करून घेतले जात आहेत. ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी मानधनाची मागणी केल्यावर त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी आणि राजीनामापत्रावर सही करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याने ‘आशा’ कर्मचाऱ्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे.
शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हे मोहीम हाती घेतली आहे. डेंग्यूच्या तीव्रतेनुसार महिनाभर ही मोहीम चालणार आहे. सर्व्हेसाठी शहरात पंचगंगा हॉस्पिटल, आयसोलेशन, फुलेवाडी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, फिरंगाई, मोरे-मानेनगर, कसबा बावडा यांच्यासह ११ केंद्रे निश्चित केली आहेत. या केंद्राद्वारे १०० ‘आशा’ कर्मचाºयांच्या माध्यमातून प्रत्येक घरात जाऊन पाणी तपासणे, कंटेनर, फ्रिज तपासणे, माहितीपत्रके वाटणे, आदी कामे केली जात आहेत. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही मोहीम शहरात घरोघरी जाऊन राबविली जात आहे.
तथापि हे काम करून घेताना ‘आशा’ कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारचा मोबदला निश्चित केलेला नाही. रोज तीन ते चार तास सर्व्हेसाठी वेळ देऊनही एक रुपयाही मोबदला दिला जात नाही. वास्तविक कोणत्याही प्रकारचा सर्व्हे असला तरी त्याचा मोबदला ठरलेला असतो. रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून तो निश्चित करून वाटला जातो. ग्रामीण भागात सादिलवार खर्चातून सर्व्हेनिहाय प्रत्येक व्यक्तीमागे ४० ते ५० रुपये मानधन ‘आशां’ना दिले जाते. याउलट कोल्हापूर शहरात मात्र काहीही मोबदला न देता काम करवून घेतले जात आहे.
२० ‘आशां’चे राजीनामे
मानधन मिळावे म्हणून आग्रह धरणाºया ‘आशां’ना ‘गरज असेल तर थांबा; नाहीतर काम सोडा,’ असे धमकावले जात आहे. या दबावाला वैतागून सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सहा आशा कर्मचाºयांनी राजीनामेही दिले आहेत. आतापर्यंत शहरातील २० आशांनी राजीनामे दिले आहेत.
१५०० रुपये मोबदलाही वेळेत नाही
सर्व प्रकारच्या सर्व्हेंचा म्हणून महिन्याला १५०० रुपये असा मोबदला निश्चित करण्यात आला आहे; पण त्याचे कधीही वेळेवर वाटप होत नाही. फुलेवाडी केंद्रावर ही रक्कम ‘आशां’ना दिली आहे. पंचगंगा केंद्रावर ‘आशां’ना आतापर्यंत ही रक्कम मिळालेली नाही. इतर केंद्रांमध्ये अशीच परिस्थिती असल्याची व्यथा ‘आशा’ंनी मांडली.
आयुक्तांकडे मागितली भेटीची वेळ
विनामोबदला राबवून घेत जात असल्याबद्दल ‘आशां’नी उपायुक्तांची भेट घेऊन गाºहाणे मांडण्याचा प्रयत्न केला; पण काहीही परिणाम झालेला नाही. उलट तक्रार का केली, म्हणून काम सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका आणि परिचारिकांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे वैतागलेल्या ‘आशां’नी आता थेट आयुक्तांकडेच भेटीची मागणी केली आहे.
टीबी सर्वेक्षणासाठी २०० रुपये दिले जातात. त्याप्रमाणेच डेंग्यू सर्व्हेचे काम जास्त असल्याने दररोज किमान १५० ते २०० रुपये द्यावेत, अशी ‘आशां’ची मागणी आहे. माहितीपत्रकावर वारेमाप खर्च करणारे महापालिकेचे आरोग्य प्रशासन सर्व्हेचा मोबदला देण्यासाठी मात्र नकार देत आहे, हे चुकीचे आणि अमानवी आहे. आयुक्तांना याबाबत विचारणा केली जाणार आहे.
- नेत्रदीपा पाटील, जिल्हाध्यक्ष, आशा कर्मचारी संघटना.
११ केंद्रे
१०० ‘आशा’ कर्मचाऱ्यांरी
प्रत्येक घरात जाऊन पाणी तपासणे, कंटेनर, फ्रिज तपासणे, माहितीपत्रके वाटणे, आदी कामे केली जात आहेत.