डेंग्यूचा डंख घातक, लागलीच चाचणी करून घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:19 PM2021-08-02T17:19:11+5:302021-08-02T17:20:23+5:30
dengue Health Kolhapur : अतिवृष्टी, महापूर यामुळे शहरात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत. डासाचे साम्राज्य वाढून डेंग्यूचा धोका वाढला आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने अंगात साधा ताप जरी असला तरी तो अंगावर काढणे, दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
कोल्हापूर : अतिवृष्टी, महापूर यामुळे शहरात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत. डासाचे साम्राज्य वाढून डेंग्यूचा धोका वाढला आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने अंगात साधा ताप जरी असला तरी तो अंगावर काढणे, दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
गेल्या दीड वर्षापासून शहरवासीयांचे आरोग्य बिघडलेले आहे. कोरोनाने नागरिकांना हैराण केले. त्याचा मुकाबला करता करता नाकीदम आला असताना आता परत अतिवृष्टी, महापुराने आजार आणले आहेत.
गॅस्ट्रो, पोटाचे विकास, डेंग्यू, चिकुनगुनिया, यासारखे गंभीर आजारही सतावत आहेत. कोल्हापूर शहरात चिकुनगुनिया, डेंग्यूचे रोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडे असे रुग्ण उपचारासाठी येत असल्याने रुग्णांचा आकडा मोठा आहे.
सर्वेक्षण थांबले
कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच अतिवृष्टी व महापूर आला. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवस महापालिका यंत्रणात त्यात व्यस्त होती. पूर ओसरल्यानंतर आरोग्य सविधा देण्यात यंत्रणा गुंतली आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियाचे सर्वेक्षणच थांबले आहे. त्यामुळे शहरात किती रुग्ण आहेत याचा नेमका अंदाज नाही.
सांधेदुखी, ताप व थंडी वाजून येते
डेंग्यू व चिकुनगुनियामुळे मनगट, घोटा, गुडगा, खांदे अशा सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. ताप येतो. थंडी वाजून येते. तांबड्या व पांढऱ्या पेशी कमी होतात. प्लेटलेट कमी झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे उचित ठरते.
डासांपासून सावध रहा
अतिवृष्टीमुळे घराच्या परिसरात चिखल, सांडपाणी साचलेले आहे. टायर्स, नारळाची बेल्टी यामध्ये पाणी साचून पाणी साचत आहे. परिसर अद्याप स्वच्छ व कोरडा झालेला नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात आळी घालतात. त्यामुळे घरातील फ्रीज, कुंड्या, प्लेट यातील साचणाऱ्या पाणीची विल्हेवाट लावली पाहिजे. डास होणार नाहीत, चावणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.
कोणती चाचणी करून घ्यावी
डेग्यू व चिकुनगुनिया झाला आहे का हे पाहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने सीबीसी, युरिन, ब्लड फॉर मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया या चाचणी करुन घेणे हिताचे ठरते. काही अपवादात्मक परिस्थितीत अँटिजेन टेस्टसुध्दा करावी. कारण कोरोना संसर्गसुध्दा झालेला असू शकतो.
ही फळे भरपूर खा
शरीरातील प्लेटलेटस् कमी झाली असल्याचे तपासणी अंती लक्षात येताच वैद्यकीय उपचाराबरोबरच किवी, ड्रॅगन, पपई, डाळिंब अशी फळे भरपूर खाल्ली पाहिजेत. प्लेटलेटस् वाढण्यात ही फळे महत्त्वाची भूमिका बजावतात.
डेग्यू व चिकुनगुनियाची लक्षणे असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला डोळा, नाक, कान, तोंड अशा जिथे भोक आहे त्याठिकाणाहून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याआधी योग्यवेळी योग्य तपासण्या करून घेणे रुग्णाच्या हिताचे ठरते.
-डॉ. विलास महाजन
माजी अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असो.