'जिल्हा सरकारी वकिलांचा मुलाखत देण्यास नकार
By admin | Published: May 26, 2015 10:26 PM2015-05-26T22:26:53+5:302015-05-27T00:56:20+5:30
सरकारी वकिलांचा नियुक्तीचा कालावधी पूर्ण व्हावयाचा असल्याने या नियुक्तीप्रक्रियेला हरकत घेणाऱ्या याचिका राज्यभरातून दाखल झाल्या होत्या.
सातारा : जिल्हा सरकारी वकील आणि तेरा सहायक सरकारी वकिलांच्या नियुक्त्या करण्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया मंगळवारी झाली; मात्र आपण त्या ठिकाणी उपस्थित राहूनही मुलाखत देण्यास नकार दिला, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी दिली. मुलाखती घेणे न्यायालयाच्या निर्णयाविरोधात असल्याचे आपण निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.अॅड. विकास पाटील-शिरगावकर म्हणाले, ‘जिल्हा सरकारी वकील आणि सहायक सरकारी वकिलांचा नियुक्तीचा कालावधी पूर्ण व्हावयाचा असल्याने या नियुक्तीप्रक्रियेला हरकत घेणाऱ्या याचिका राज्यभरातून दाखल झाल्या होत्या. मुदतीपूर्वी नवीन नियुक्त्या करू नयेत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला होता. जिल्ह्यातील कऱ्हाड आणि वडूज न्यायालयात ही पदे रिक्त असल्याने या जागांचा अपवाद केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी आणि खंडाळ्याचे अॅड. बाळकृष्ण वामन पंडित यांनी नवीन नियुक्त्यांसाठी मुलाखती घेतल्या. मुलाखतीवेळी मी तेथे उपस्थित राहिलो; मात्र मुलाखत देणे खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध असल्याचे सांगून मुलाखत देण्यास नकार दिला.’ ‘शासनाच्या आदेशावरून या मुलाखती घेतल्या जात असल्याचे मला सांगण्यात आले; मात्र विधी अधिकाऱ्यांच्या विहित मुदती संपल्या नसल्याने शासनाने प्रक्रियेला स्थगिती देणे आवश्यक होते,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)