दिवसेंदिवस घटते आहे कोल्हापूरचे घनदाट जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:22 AM2021-03-21T04:22:41+5:302021-03-21T04:22:41+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वनसंपदा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे वनखात्याच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर ...

The dense forest of Kolhapur is declining day by day | दिवसेंदिवस घटते आहे कोल्हापूरचे घनदाट जंगल

दिवसेंदिवस घटते आहे कोल्हापूरचे घनदाट जंगल

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वनसंपदा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे वनखात्याच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील वनआच्छादन हे केवळ साडेनऊ टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे. वनविभागाने २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्वांत अलीकडच्या ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट’मधील नोंदीनुसार जिल्ह्यातील जंगलक्षेत्र हे ९.६८ टक्क्यांनी कमी झाल्याचे दर्शविते.

कोल्हापूर हे पश्चिम घाटातील महत्त्वाचे जंगलक्षेत्र असून, या परिसरातील जंगलाचे क्षेत्र कमी होणे ही पर्यावरणाची मोठी हानी आहे. त्याबद्दल पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून, ही घट अतिशय गंभीर असल्याचे मतही व्यक्त केले आहे.

‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट’ हा २०१७ ते २०१९ या दोन वर्षांतील पाहणीचा अहवाल आहे. यामध्ये अतिशय घनदाट, मध्यम आणि खुले वनक्षेत्र अशा तीन प्रकारच्या वर्गवारीच्या नोंदी निरीक्षणासाठी घेतल्या आहेत. २०१७ च्या तुलनेत कोल्हापुरातील वनक्षेत्र हे २०१९ च्या डिसेंबरअखेर ९.६८ चौरस किलोमीटर इतके कमी झाल्याचे या अहवालात दिसून येते, तर खुरटे जंगल हे १०२.८३ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे. हा अहवाल केवळ उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रावरून निश्चित केला आहे.

पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने घनदाट जंगल असणे महत्त्वाचे आहे. मात्र, सर्वत्रच हे जंगल कमी होत चालले आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. घनदाट जंगल वाढण्याऐवजी खुरटे जंगल वाढत आहे हे आकडेवारी पाहिल्यास सिद्ध होते.

वनसंपदेला मारक असणारी कारणे

राखीव जंगलांतही मोठ्या प्रमाणात होणारी चोरटी वृक्षतोड, त्यातील मानवी हस्तक्षेप, संरक्षित जंगलालाही लागणारा वणवा यासारखी अनेक कारणे गंभीर आहेत. जमिनींचे संपादन, प्राण्यांचा नेहमीचा कॉरिडॉर बंद होणे, जंगलांना लागणारा वणवा आणि मनुष्य-वन्यप्राणी संघर्षाचाही परिणाम ही वनसंपदेला मारक असणारी कारणे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितली आहेत. यासाठी खासगी जंगलावरही वनखात्याचे नियंत्रण आणणे, चोरटी वृक्षतोड थांबविणे, जास्तीत जास्त वनक्षेत्र संरक्षित करणे यासारख्या उपाययोजना कठोरपणे करणे गरजेचे आहे.

चौकट

कोल्हापूर वनवृत्त क्षेत्र

वनखात्याच्या ताब्यातील जमीन /वनविकास महामंडळाकडील जमीन /वन्यजीव विभागाकडील जमीन / एकूण वनक्षेत्र

कोल्हापूर : १३३५.७१/१५.५६/३९०.३२/१७४१.५९

सातारा : ११७३.३६/०/३९४.२७/१५६७.६३

सांगली : ४१६.४५/०/११७.२९/५३३.७४

सिंधुदुर्ग : ५५६.०१/०/०/५५६.०१

रत्नागिरी : ९१.४१/०/४.६२/९६.०३

------------------------------------

एकूण : ३५७२.९४/१५.५६/९०६.५/४४९४.५५

(आकडेवारी चौ. कि.मी.मध्ये -२०१९-२०२०)

-----------------------------

अभयारण्यांचे क्षेत्र

राधानगरी-दाजीपूर अभयारण्य (३५१.१६ चौ.कि.मी)

चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७० चौ.कि.मी)

कोयना वन्यजीव अभयारण्य (४२३.५५० चौ.कि.मी)

--------------------------------

'कॉन्झर्व्हेशन रिझर्व्ह'चे क्षेत्र

कोल्हापूर : विशाळगड (९,३२४), पन्हाळा (७,२९१), गगनबावडा (१०,५४८), आजरा-भुदरगड (२४, ६६३) चंदगड (२२,५२३), सातारा - जोर-जांभळी (६,५११), मायणी पक्षी अभयारण्य (८६६), सिंधुदुर्ग - आंबोली-दोडामार्ग (५६९२).

(सह्याद्रीच्या वनक्षेत्रामधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षण मिळाले आहे. कंसातील आकडे हेक्टरमध्ये)

----------------------

कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलाची स्थिती

भौगोलिक क्षेत्र : ७६८५

एकूण जंगल : १७८६.३२

घनदाट जंगल : ६४.००

मध्यम जंगल : १०२०.४४

खुले जंगल : ७०१.८८

खुरटे जंगल : १०२.८३

एकूण घट : ०९.६८

भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत टक्केवारी : २३.२४

(आकडेवारी चौ. कि.मी.मध्ये -२०१७ ते २०१९)

कोट

जंगलक्षेत्र कमी होण्याला मानवी हस्तक्षेपच प्रामुख्याने कारणीभूत आहे. राधानगरीसारख्या अभयारण्याला संरक्षित वनाबाबतची अंतिम अधिसूचना अद्यापही निघालेली नाही, यावरूनच जैवविविधतेच्या बाबतीत सरकार किती गंभीर आहे, हे लक्षात येते. पश्चिम घाटाचा समावेश असलेल्या कोल्हापुरातील पश्चिम भागातील आठ तालुक्यांतील जंगल असेच हळूहळू नष्ट होईल, अशी भीती आहे.

- डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण तज्ज्ञ.

------------------

Web Title: The dense forest of Kolhapur is declining day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.