देवरा कोल्हापूरचे नवे पालक सचिव
By admin | Published: February 3, 2015 11:29 PM2015-02-03T23:29:08+5:302015-02-03T23:59:27+5:30
प्रश्न मार्गी लागण्यास मदत : जिल्ह्याची माहिती असणारा अधिकारी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे ‘नवे पालक सचिव’ म्हणून आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांची मंगळवारी राज्य शासनाने नियुक्ती केली. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. पूर्वीच्या पालक सचिवांमध्ये काही फेरबदल केले आहेत.राज्य शासन, मंत्रालय, पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पालक सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा मंत्रालय स्तरावर त्यांच्याकडून पाठपुरावा होतो. यापूर्वी शिवाजीराव देशमुख, मनुकुमार श्रीवास्तव यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. देवरा पालक सचिव झाल्याने या जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी यापूर्वी १९९८-९९ ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर लगेच महापालिका आयुक्त व त्यानंतर जिल्हाधिकारी या पदांवर सलग काम केले आहे. त्यामुळे त्यांना शहरापासून जिल्ह्यापर्यंत व जिल्हा प्रशासनाच्या अडीअडचणी चांगल्याच माहीत आहेत. त्या सोडविण्यासाठी काय करायला हवे, याची जाण त्यांना आहे. सरकारदरबारी पाठपुरावा करून ते समस्यांचे निराकरण करतील.