विभागीय कार्यालयांनी धूळ झटकली

By admin | Published: September 30, 2015 12:24 AM2015-09-30T00:24:47+5:302015-09-30T00:36:59+5:30

महापालिका निवडणूक : प्रशासन गतिमान, सात क्षेत्रीय कार्यालये सुरू; चार-चार अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या -सुपर व्होट

Departmental offices shake dust | विभागीय कार्यालयांनी धूळ झटकली

विभागीय कार्यालयांनी धूळ झटकली

Next

कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच त्याच्या तयारीला अधिक वेग आला आहे. सात विभागीय कार्यालयांत सात निवडणूक निर्णय अधिकारी व सात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीचे आदेश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. त्यांच्या सोबतीला महापालिकेचे दोन-दोन अधिकारी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त यादीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी व ‘समकक्ष वर्ग १’ या वर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मनपा निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून, १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी ८१ प्रभागांची ७ क्षेत्रीय कार्यालयांनुसार विभागणी केली आहे. त्याकामी ७ अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, यापुढे त्या-त्या कार्यालयांतून कामकाज चालेल.

आचारसंहितेसाठी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीनिमित्त मंगळवारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली.
बैठकीत आचारसंहितेबाबत महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय असावा, शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, या व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत आचारसंहिता पालन करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
यावेळी उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, सहायक संचालक (नगररचना) धनंजय खोत, पोलीस उपअधीक्षक बी. जी. राणे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, अरविंद चौधरी, अनिल देशमुख, दयानंद ढोमे, महादेव साळोखे, शिवाजी जाधव, अशोक निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, आदी उपस्थित होते.


साधनांची उपलब्धता
निवडणुकीच्या कामकाजासाठी सात विभागीय कार्यालये अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. या कार्यालयांनी आवश्यक ते कर्मचारी, फर्निचर, टी.व्ही., लाईटसह फोनची सुविधा, निवडणूक निर्णय अधिकारी व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांना वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू होते.
१६० अनधिकृत डिजिटल फलक हटविले
कोल्हापूर : शहरात सध्या आचारसंहितेच्या अंमलबजावणी अंतर्गत मंगळवारी शहरातील विनापरवाना असलेले १६० डिजिटल बोर्ड व ११०० बॅनर हटविण्याची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये कळंबा रोड, फुलेवाडी रिंगरोड, जिवबा नाना पार्क, देवकर पाणंद, संभाजीनगर, सानेगुरुजी वसाहत, कसबा बावडा तसेच शहरातील इतर ठिकाणी कारवाई करण्यात आली. तरी शहरातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी विनापरवाना फलक तातडीने काढून घेत आचारसंहितेचे पालन करावे, अन्यथा आचारसंहिता भंगचे गुन्हेही दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


आचारसंहिता कक्षाची स्थापना; कामकाज सुरु
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख सोमवारी जाहीर होताच आचारसंहिताही तत्काळ लागू झाली. निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणी- करिता प्रशासनाने मंगळवारी खास आचारसंहिता व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली असून, एक नियंत्रण अधिकारी, दोन नोडल अधिकारी आणि ४२ झोनल अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून त्यांना तातडीने कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व झोनल अधिकाऱ्यांना सर्व डिजिटल फलक, बॅनर्स, राजकीय पक्षांचे झेंडे काढण्याच्याही सूचना देण्यात आल्या असून, आज, बुधवारपासून या कामाला सुरुवात होत आहे.
आचारसंहिता अंमल- बजावणीची तत्काळ सुरुवात झाली आहे. मंगळवारी ताराबाई पार्कमधील कार्यालयात आचारसंहिता व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे प्रमुख नियंत्रण अधिकारी म्हणून नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांची नियुक्ती केली असून, नोडल अधिकारी म्हणून रमेश मस्कर व महादेव फुलारी यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक दोन प्रभागांसाठी एक याप्रमाणे ४२ झोनल अधिकाऱ्यांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्या-त्या भागांत आचारसंहितेची अंमलबजावणी करणे, प्राप्त होणाऱ्या तक्रारींनुसार चौकशी करणे, संबंधितांवर गुन्हे दाखल करणे, अशी कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत.

Web Title: Departmental offices shake dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.