Kolhapur: सणात हद्दपार गुन्हेगार परतले, पोलिसांनी चौघांना पुन्हा जेरबंद केले; अनेक आरोपी मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 04:08 PM2024-09-09T16:08:44+5:302024-09-09T16:08:59+5:30
कोल्हापूर : गणपती बाप्पांच्या आगमनासोबतच काही हद्दपार आरोपींनीही आदेशाचा भंग करत जिल्ह्यात प्रवेश केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...
कोल्हापूर : गणपती बाप्पांच्या आगमनासोबतच काही हद्दपार आरोपींनीही आदेशाचा भंग करत जिल्ह्यात प्रवेश केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चार आरोपींना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. हद्दपारीचा भंग केलेल्या अनेक आरोपींनी जिल्ह्यात ठाण मारले असल्याने स्थानिक पोलिस ठाण्यांना कारवाईची मोहीम सुरू करावी लागणार आहे.
गंभीर गुन्ह्यांत सहभाग असलेल्या आरोपींवर पोलिस अधीक्षक आणि महसूल अधिका-यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. हद्दपारीच्या काळात आरोपींनी आदेशाचे उल्लंघन करू नये, असे त्यांना पोलिसांकडून बजावले जाते. मात्र, काही आरोपी पोलिसांची नजर चुकवून जिल्ह्यात येतात आणि पुन्हा अवैध धंदे आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होतात. गणेशोत्सव सुरू होताच काही आरोपींचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी हद्दपार आरोपींची धरपकड सुरू केली आहे.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निरंजन वसंत ढोबळे (वय ३६) आणि कुलदीप बाजीराव लांबोरे (४०, दोघे रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांना पद्मावती उद्यान परिसरातून पोलिसांनी अटक केली. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमेश उर्फ गोट्या बबन विटेकर (३०, रा. कनाननगर) याला कनाननगरातून, तर कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकांत शिवाजी दाभाडे (३०, रा. साखरवाडी, कोडोली, ता. पन्हाळा) याला कोडोली बस स्टँड परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर आदेश भंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस ठाण्यांचे दुर्लक्ष?
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना दिसणारे आरोपी संबंधित पोलिस ठाण्यांतील पोलिसांना का दिसत नसावेत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अनेक हद्दपार आरोपी जिल्ह्यात ठाण मांडून असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.