दीड लाख कुटुंबांना ‘डिपॉझिट फ्री गॅस’

By admin | Published: March 2, 2016 12:04 AM2016-03-02T00:04:44+5:302016-03-02T00:44:32+5:30

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे : अर्थसंकल्प तरतुदीचा जिल्ह्याला फायदा

Deposit free gas for 1.5 lakh families | दीड लाख कुटुंबांना ‘डिपॉझिट फ्री गॅस’

दीड लाख कुटुंबांना ‘डिपॉझिट फ्री गॅस’

Next

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ८३७ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना विनाठेव गॅसकनेक्शन देण्यास गती मिळणार आहे. विनाठेव गॅसचे कनेक्शन देण्यास राज्य शासनाने या अगोदरच सुरुवात केली आहे. विनाठेव कनेक्शन मिळाले तरी शेगडीसाठी संबंधित कुटुंबांना पैसे मोजावे लागतात. याशिवाय भरलेले सिलिंडर घेण्यासाठी प्रत्येकवेळी मोजावे लागणारे ५४७ रुपयांची जुळवाजुळव करताना गरीब कुटुंंबांची आर्थिक ओढाताण होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात घरातील प्रमुख महिलेच्या नावे एलपीजी गॅस कनेक्शन देण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. गरिबांना सवलतीमध्ये गॅस देण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीच्या अंमलबजावणीचे सविस्तर आदेश आलेले नाहीत. परंतु, जिल्हा पुरवठा प्रशासन तयारीला लागले आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची तालुकानिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ठेव न घेता गॅस सिलिंडर देण्याच्या योजनेला गती दिली जात आहे.चुलीच्या धुरामुळे आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे सवलतीमध्ये गॅस सिलिंडर घ्या, असे आवाहन गॅस एजन्सीच्या माध्यमातून केले जात आहे. केरोसीनमुक्त (रॉकेल) गाव संकल्पनेतून अनेक गावांतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना कनेक्शननंतर शेगडी खरेदीसाठी दानशूर व्यक्तींतर्फे आर्थिक मदत दिली जात आहे. गरिबांना गॅस कनेक्शनसाठी केंद्राचीही मदत होणार आहे. दरम्यान, सध्या एका घरगुती सिलिंडरसाठी ८५ रुपये अनुदान आहे. मात्र, पहिल्यांदा पूर्ण ५४७ रुपये भरून सिलिंडर घेतल्यानंतर अनुदान नंतर बँकेतील खात्यावर जमा होते. त्यामुळे सवलतीमध्ये कनेक्शन मिळाल्यानंतर प्रत्येकवेळी भरलेले सिलिंडर घेण्यासाठी पैसे गोळा करताना संबंधित कुटुंबाची आर्थिक ओढाताण होणार आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी गॅस सिलिंडरसाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशांत सवलत मिळावी, अशी मागणी होत आहे.


राज्य शासनाची दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी ‘डिपॉझीट फ्री गॅस कनेक्शन’ ही योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना विनाठेव गॅस कनेक्शन दिले जात आहे. केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पातील गॅससंंबंधीच्या तरतुदीनुसार शासनाकडून सूचना आल्यानंतर अंमलबजावणी केली जाईल.
- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी


सर्वाधिक कागल तालुक्यात..
सवलतीमध्ये गॅस मिळविण्यास पात्र असलेले तालुकानिहाय दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अशी : करवीर - ११९५१, कागल - १४६८३, पन्हाळा - १४६१८, शाहूवाडी - ९७७९, राधानगरी - १३६०३, गगनबावडा - ९२६, भुदरगड - ८६२०, गडहिंग्लज - ९०६८,
चंदगड - ७८७३, आजरा - ५००४, शिरोळ - १३६०४, हातकणंगले - १७५१६, इचलकरंजी शहर - ११४९४, कोल्हापूर शहर - ९०९८.

Web Title: Deposit free gas for 1.5 lakh families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.